२३ नोव्हेंबर १९९४.. गोवारी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानभवनावर काढलेल्या मोर्चानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ जणांचे बळी गेले होते. गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून गोवारी शहीद दिन आयोजित केला जात आहे. उद्या, शुक्रवारी टी पाईंटजवळील गोवारी स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारो गोवारी बांधव नागपूरला येणार असल्यामुळे प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.
२३ नोव्हेंबर १९९४ ला घटना घडल्यानंतर राज्यातील विविध भागातील गोवारी समाज मोठय़ा संख्येने संघटित झाला आणि न्याय मागण्यांसाठी सरकारशी लढू लागला. अधिवेशनाच्या काळात किंवा त्या पूर्वीच गोवारी स्मृती दिन येत असल्यामुळे दरवर्षीच गोवारी समाजाबाबत काही ठोस निर्णय होईल, अशी आशा घेऊन गोवारी बांधव मोठय़ा प्रमाणात येतात, मात्र दरवर्षी स्मृती दिन येतो आणि जातो. गोवारी बांधवांच्या हाती काहीच पडत नाही.
गोवारी समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर गजबे यांच्यासह या समाजाचे अनेक नेते गेल्या अनेक वर्षांपासून समाजाचे नेतृत्व करीत गोवारी स्मृती दिन आयोजित करीत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनाही समाजातील काही लोकांकडून विरोध व्हायला लागला आहे. समाजामध्ये गटातटाचे आणि श्रेय घेण्याचे राजकारण सुरू झाले
आहे.
आपसातील मतभेद वाढले आहेत. त्यामुळे गोवारी समाज दुंभगतो की काय? असे वाटायला लागले आहे. यावेळी गोवारी समाजाचे नेते सुधाकर गजबे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, गोवारी समाज गेल्या काही वर्षांत संघटित झाला आहे. समाजाचे नवीन नेते समोर येत आहेत. समाजामध्ये कुठलेही मतभेद नसून सर्व मिळून समाजासाठी काम करीत आहेत. आजही गोवारी समाजातील अनेक युवकांना रोजगार नाही. व्यवसायासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत, अशी परिस्थती आहे. ज्यांच्या कुटुंबातील लोक या घटनेत मृत झाले, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून त्यावेळी मदत करण्यात आली होती, मात्र ती मदत पुरेशी नसल्याची खंत शहरातील अनेक गोवारी बांधवांनी व्यक्त केली.
गोवारी बांधवाना मदत नको, मात्र त्यांच्या समाजाला सन्मानाची वागणूक द्या. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करा, अशी मागणी गोवारी बांधव करीत आहेत.
राज्यात एकही गोंड गोवारी या नावाची व्यक्ती सापडत नाही, त्याबद्दल एकही पुरावा शासनाकडे उपलब्ध नाही. गोवारी जमात अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून पूर्णत: वंचित
आहे.  चुकीच्या नोंदीचा फायदा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या जमातीच्या नेत्यांनी घेऊन शासनावर सामूहिकपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गोवारी समाजाला न्याय मिळाला नाही. न्याय्य मागण्यांसाठी गोवारी समाजाने लढा तीव्र करणे हा एकच उपाय असल्याचे गजबे म्हणाले.    
वाहतुकीत बदल
गोवारी शहीद दिनानिमित्त उद्या, शुक्रवारी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. व्हरायटी चौकातून रिझव्र्ह बँककडे जाणारा मार्ग सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. टी पॉईंट परिसरात अनेक सामाजिक संघटनातर्फे भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.