सक्करदरा चौकातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने पाच वर्षांंपासून धूळखात पडून आहे. अद्यापही या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळालेली नाही. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असती तर महाविद्यालयाची वाटचाल विकासाकडे सुरू झाली असती, असे आता बोलले जात आहे.
या महाविद्यालय व रुग्णालयात सध्या १८० खाटांची व्यवस्था आहे. त्यात १५० खाटांची आणखी वाढ करावी. त्यासाठी ५ कोटी ५६ लाख रुपये खर्चाची तरतूद करावी, असा प्रस्ताव पाच वषार्ंपूर्वी पाठवण्यात आला होता. परंतु पाच वर्षे लोटून गेल्यानंतरही या महाविद्यालयात एका खाटेचीही वाढ झाली नाही. काही दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या प्रशासनाने आणखी एक प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवला आहे. त्यात रुग्णालय, वसतिगृह, ग्रंथालय, स्टाफ नर्स, डॉक्टरांसाठी सदनिका, खेळाचे मैदान, फर्निचर, सभागृह बांधण्यात यावे, यांचा समावेश आहे. तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या २०० जागांना आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या ६०० जागांना मान्यता द्यावी, असेही प्रस्तावात म्हटले होते. हे काम करण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. या रकमेचाही उल्लेख प्रस्तावात आहेत. हा हायटेक प्रस्तावही गेल्या दीड वर्षांपासून धूळखात पडला आहे. ही माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली.
रुग्णालयाच्या या प्रयत्नांना परिसरातील दुकानदारही अडसर ठरत आहे. महाविद्यालयाच्या २१ हजार वर्गफूट जागेवर चिल्लर दुकानदारांनी दुकाने थाटली आहेत. ही जागा दुकानदारांना भाडेतत्वावर दिली आहे. प्रशासनाला मात्र एक रुपयाही भाडे मिळत नाही. रुग्णालयाला हायटेक करण्याच्या दृष्टीने प्रशासन गंभीर झाले आहे. अनेक विकास कामे करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवले जात आहे. परिसरात वसतिगृह, प्रयोगशाला, वाचनालय व इतर इमारती बांधण्यासाठी जागेची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने एक वर्षांपूर्वी या दुकानदारांना नोटीस पाठवून एक महिन्याच्या आत दुकाने खाली करावे, असे त्यात म्हटले होते. ही नोटीस पाठवून एक वर्षे पूर्ण झाले तरी एकाही दुकानदाराने दुकान खाली करून दिले नाही. ही जागा रिकामी करण्याबाबत प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनाही पत्र पाठवले. तत्पूर्वी, प्रशासनाच्या कारवाईविरोधात चिल्लर दुकानदार संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रशासनाने या दुकानदारांचे काय म्हणणे आहे, याबाबत चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. परंतु, यावर अद्यापही तोडगा निघाला नाही.