ग्रामीण भागातील शिक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून यामुळे अनेक शाळा बंद पडत असल्याचा आरोप, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव ठाकरे यांनी येथे बोलताना केला.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी मंत्री भाई वैद्य संस्थापक असलेल्या अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या मोफत शिक्षण हक्क प्रबोधन जनजागरण प्रचार दौऱ्यात मलकापूर(ता. कराड) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे संयोजक व मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यापक सभेचे संघटक हसनभाई देसाई, हिम्मतराव साळुंखे, राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व शिक्षकनेते संभाजीराव थोरात यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले,की प्रत्येक मुलाला शिक्षण अनिवार्य करून ते मोफत देण्याची जबाबदारी सरकारची असून, शिक्षणावर ६० टक्के खर्चाची तरतूद करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्यास भारत लवकरच महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संभाजीराव थोरात म्हणाले, की शिक्षणाला अनादिकाळापासून परंपरा आहे. गरिबांच्या शाळा वेगळय़ा अन् श्रीमंतांच्या शाळा वेगळय़ा हा भेदभाव केंद्र व राज्य सरकारने केला आहे. आज जर, शिवराय असते तर शिक्षणाची हेळसांड करणाऱ्यांचा त्यांनी निश्चितच रायगडावरून कडेलोट केला असता.
प्रास्ताविकात अशोकराव थोरात यांनी शिक्षणविषयक राज्यशासनाच्या भोंगळ आणि अन्यायी कारभाराचा समाचार घेतला. स्वातंत्र्याला ६५ वष्रे उलटली तरी, शालाबाह्य मुलांचे प्रमाण लक्षणीय असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. शिक्षणाची पूर्णपणे हेळसांड करण्याचे काम सरकार करीत असून, त्यामुळे शिक्षणाचे धिंडवडे निघत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. शिक्षणाच्या दुरवस्थेला समाजाचे अज्ञान नव्हे, तर विद्याविभूषितांची आणि सरकारची भूमिका कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमाला भानुदास मोहिते, बी. बी. पाटील, तुळशीराम शिर्के, ए. टी. थोरात, प्राचार्य आर. आर. पाटील, एस. ए. पाटील, एस. वाय. गाडे उपस्थित होते.