गोदामाअभावी धान उघडय़ावर ल्ल नुकसानभरपाई करण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वी आलेल्या अकाली पावसाचा फटका कनेरी-राम येथील धान खरेदी केंद्रावर ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यासाठी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील कनेरी-राम येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेले धान ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था केली नाही. धान ठेवण्यासाठी शेड व ताडपत्रीची व्यवस्थासुद्धा नाही. त्यामुळे दोन दिवसापूर्वी आलेल्या अकाली पावसाचा फटका खरेदी केंद्रात उघडय़ावर असलेल्या धानाच्या शेतकऱ्यांना बसला आहे.
पावसामुळे मोठय़ा प्रमाणात धान ओले झाले. या केंद्रावर परिसरातील बऱ्याच गावातील शेतकरी धान विकण्याकरिता आणत आहेत, मात्र धान खरेदी केंद्रावर धान ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे धान सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असून उघडय़ावरच धान ठेवावे लागत आहे.
आदिवासी विकास महामंडळांर्तगत सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर बारदाण्याचादेखील तुडवडा असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास महामंडळांर्तगत सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावरील भोंगळ कारभार समोर आला आहे.
पावसामुळे बऱ्याच प्रमाणात धान खरेदी केंद्रावर खरेदीअभावी पडून असलेला शेतकऱ्यांचा धान ओला होऊन नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ओले धान घेण्यास नकार
वार्ताहर,भंडारा

जिल्ह्य़ात अवकाळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचा केंद्रावर ठेवलेला धान भिजला असून आता या धानाची खरेदी करण्यास आधारभूत केंद्रचालक नकार देत असल्याने ओला धान शेतकऱ्यांची माथी बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.  तीन दिवसांपूर्वी अवेळी आलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शासकीय आधारभूत केंद्रांवर उघडय़ावर असलेला धान ओला झाला. या धानाचा दर्जा कमी होत असल्याने हा धान खरेदी करण्यास आता नकार दिला जात आहे,  मात्र अनेक दिवसांपासून केंद्रावर पडून असलेल्या धानाची मोजणी होत नसल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, असा विचार करण्यास केंद्रचालक तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर ओल्या धानाचे आलेले संकट दूर करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.