जन्मत:च अपंग आणि गतिमंद असूनही विविध कौशल्ये आत्मसात करून विशेष मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पुरस्काराची मानकारी ठरलेल्या ठाणेकर वंडरगर्ल ‘मनाली’चे संगोपन करताना आलेल्या अनुभवांवर आधारित तिची आई, स्मिता कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘तिची कहाणीच वेगळी’ या पुस्तकाने गेल्या चार वर्षांत दहाव्या आवृत्तीपर्यंत मजल गाठली असून तब्बल १५ हजारांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.
शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अपंग असूनही अतिशय सकारात्मक पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनालीची ही कथा मोठय़ा प्रमाणात वाचकांपर्यंत पोहोचविण्यात तिचे वडील- संदीप कुलकर्णी यांचे मोठे योगदान आहे. गेल्या चार वर्षांत मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील ग्राहक पेठ तसेच गृहोपयोगी पुस्तकाच्या प्रदर्शनांमधून आपल्या लेकीचे हे पुस्तक ते विकत आहेत. एका स्टॉलवर एकच पुस्तक विकणाऱ्या संदीप कुलकर्णीना प्रदर्शनात उत्तम प्रतिसाद मिळतो. जन्मत:च मणक्याचा आजार असणारी मनाली व्हीलचेअरशिवाय हिंडू-फिरू शकत नाही. तरीही सुरुवातीला ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेत नियमित हजेरी लावत मनालीने विविध कलांमध्ये विशेष कौशल्य आत्मसात केले. सातत्याने दुखण्यांचा सामना करावा लागत असूनही सदैव हसऱ्या चेहऱ्याने जीवनाला समोरे जाणाऱ्या मनालीला २००६ मध्ये राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्यानंतर स्मिता कुलकर्णी यांनी ‘तिची कथाच वेगळी..’ हे पुस्तक लिहिले. पुस्तक प्रकाशनानंतर वितरणाचा असा कोणताच अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. तेव्हा सुरुवातीला स्मिता आणि संदीप दोघांनीही ठाणे-मुंबई परिसरातील सर्व ग्रंथालये तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांना या पुस्तकाची माहिती दिली. त्यातूनच पुढे व्यापारी पेठ अथवा ग्राहोपयोगी प्रदर्शनांमधून पुस्तक विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरवर्षी साहित्य संमेलनातही मनालीच्या या कहाणीचा स्टॉल असतो. विविध दहा पुरस्कार मिळालेल्या या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही लवकरच प्रसिद्ध होणार आहे.  
‘याला जीवन ऐसे नाव..’
‘आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी अवस्था असणाऱ्यांना मनालीची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायक आहे. त्यामुळेच टाटा रुग्णालयाने तिच्या विलक्षण जीवनशैलीवर आधारित लघुपट तयार केला आहे. याशिवाय अविनाश आणि ऐश्वर्या नारकर अभिनित ‘होप’ नावाच्या लघुपटातही ही कहाणी दृक्श्राव्य पद्धतीने मांडण्यात आली आहे. यात मनालीच्या आई-वडिलांची भूमिका या दोन कलावंतांनी साकारली आहे. मनालीची ही कहाणी तिच्यासारख्याच दुर्घर आजाराशी सामना करणाऱ्या मुलांना, तसेच पालकांना मार्गदर्शक ठरते. स्मिता कुलकर्णी शाळेत शिक्षिका आहेत. नोकरी आणि मनालीचे संगोपन सांभाळून त्या अशा प्रकारच्या समस्या भेडसाविणाऱ्या पालकांचे समुपदेशनही करतात. त्यासाठी त्यांनी तसे रीतसर प्रशिक्षणही घेतले आहे. संदीप कुलकर्णी नोसिल कंपनीत होते. २००३ मध्ये कंपनी बंद झाली आणि त्यांनी स्वत:चा शेअर ब्रोकरचा व्यवसाय सुरू केला. त्यांची धाकटी मुलगी सन्मिता आता अकरावीत असून तीही तिची मोठी बहीण असणाऱ्या मनालीची विशेष काळजी घेते. कधी कधी वडिलांना स्टॉलवर पुस्तक विक्रीत मदतही करते.