मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळनंतर नागपूर जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त भागापैकी नरखेड तालुक्यातील गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याचवेळेस या परिसरात बोराएवढय़ा गारांचा पाऊस झाल्याने निसर्गाने प्रत्यक्ष पुरावाच मुख्यमंत्र्यांना दिला.
उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गारपीटग्रस्त भागांचा बुधवारी दौरा केला. सायंकाळी ते नागपुरात पोहोचले. विमानतळावरून त्यांनी हेलिकॉप्टरने नरखेडकडे प्रयाण केले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या आग्रहावरून नरखेड भागात पाहणी केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शहरात जाणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी नरखेड तालुक्यातील मोहगाव (भदाडे) गावाजवळील संजय कामडी व अरुण उमाठे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी आमदार सुनील शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजीव पोतदार आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांकडून त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. राज्याच्या २५ जिल्ह्य़ात गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचा पाहणी अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जाईल. केंद्र शासनाची तीन पथके पाहणी करतील. मदतनिधी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही, असे त्यांनी गारपीटग्रस्तांना सांगितले. मागील अतिवृष्टीची मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आचारसंहितेचा बाऊ न करता शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी राजीव पोतदार यांनी मुख्यमंत्र्यांना केली. संत्री उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, गहू व हरभरा एकरी २५ हजार रुपये मदतीची मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली.  मुख्यमंत्री पाहणीसाठी निघाले तेव्हा गारपीट व पावसाने त्यांचा जणू पाठलाग केला. सावरगाव, मालापूर, वेणीकोणी, तीनखेडा परिसरात सुमारे पंधरा मिनिटे गारपीट व पाऊस झाला. बोराएवढय़ा गारांनी या परिसराला झोडपून काढले. गारपीट व पाऊस याचे वास्तव अनुभव मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी अनुभवले. पंधरा दिवसांपूर्वी या परिसरात तेवढे नुकसान झाले नव्हते. ८० टक्के पिके वाचल्याने शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला होता. मात्र, कालच्या गारपीट व पावसाने अध्र्याहून जास्त नुकसान केले. कशीबशी वाचलेली हरभरा, गहू व संत्री पीक नष्ट झाले.