महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम (आयटीआय) दहावी अथवा बारावीला समकक्ष करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात ही समकक्षता मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची काही विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. आयटीआय पूर्ण केल्यावरही शाखेनुसार काही विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय दहावी किंवा बारावीला समकक्षता देऊ नये, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून शासनाला पाठवण्यात येणार आहे.
आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता यावा यासाठी हे अभ्यासक्रम दहावी आणि बारावीला समकक्ष करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आठवीनंतर आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दहावीला आणि दहावीनंतर आयटीआय पूर्ण केल्यास बारावीला समकक्षता देण्याचा निर्णय शासनाने गेल्या महिन्यामध्ये घेतला होता. मात्र, फक्त आयटीआय पूर्ण केल्यानंतर दहावी व बारावीला समकक्षता देण्यात येऊ नये, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पाठवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. आयटीआय केल्यानंतर कला शाखेसाठी इंग्रजी, वाणिज्य शाखेसाठी इंग्रजी, एसपी, विज्ञान शाखेसाठी विज्ञानातील उपविषय (उदा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, वगैरे) आणि गणित यांपैकी कोणतेही तीन विषय उत्तीर्ण करावे लागणार आहेत.