मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूण रेल्वेची परीक्षा देण्यासाठी मुंबईत आला. परंतु त्याच काळात त्याची बॅग चोरीला गेली. आता घरी ओरडतील या भीतीने तो मुंबईतच राहिला अन् हळूहळू वाईट संगतीत राहून स्वत:च चोर बनला. डॉ. दादाभाई भडकमकर मार्ग पोलिसांनी रवी वर्मा या तरुणाला अटक केली तेव्हा त्याची अशी पाश्र्वभूमी बाहेर आली. रेल्वेची परीक्षा देऊन सरकारी बाबू बनण्याची स्वप्ने रंगवत रवी २००३ मध्ये मुंबईत आला. त्यासाठी त्याने जोरदार अभ्यास केला होता. परंतु मुंबईला येणारी गाडी उशिरा आल्याने तो परीक्षेला पोहोचू शकला नाही. त्यामुळे एक रात्र मुंबईत घालविण्यासाठी गेस्ट हाऊस शोधू लागला. परंतु गेस्ट हाऊसचे भाडे न परवडल्याने त्याने रस्त्यावरच रात्र काढण्याचे ठरविले. तो पदपथावर झोपून गेला. त्यावेळी त्याची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली. जवळचे पैसे तर गेलेच; परंतु शैक्षणिक प्रमाणपत्रेही चोरीला गेली. आता आपली काही खैर नाही, असे वाटून त्याने घरी न जाण्याचे ठरविले. घरी काहीही न कळवता तो दक्षिण मुंबईत एका उपहारगृहात काम करू लागला. तेथे इतर कर्मचाऱ्यांसोबत त्याची दोस्ती झाली. तो छोटय़ाछोटय़ा चोऱ्या करू लागला. ते पाहून हॉटेलमालकाने त्याला समजावले. परंतु त्याच्या वागण्यात बदल झाला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने त्याला दुसऱ्या हॉटेलात पाठविले. परंतु तेथेही त्याला वाईट संगत मिळाली आणि तो बॅगा चोरू लागला. या प्रकरणात त्याला अटक झाली आणि दोन वर्षांचा तुरुंगवासही झाला. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बॅग चोरीचा धंदा सुरू केला. इतकेच नव्हे तर स्वत:ची टोळीही बनविली. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला.