साधारणत: वयाच्या पन्नाशीनंतर होणारा हृदयविकार आता तरुणांमध्येही बळावू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात पस्तीशीनंतर हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण असेच वाढत राहिले तर भारतात सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  
तरुण वर्ग हा त्या देशाचा आधारस्तंभ असतो. मात्र, दिवसेंदिवस तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण, शारीरिक श्रमांचा अभाव, आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर यामुळे हृदयरोग वाढत आहे. जंकफूड रिचवत विविध वाहिन्यांवरील कार्यक्रम बघण्याची तरुणांमध्ये आता फॅशन झाली आहे. त्याचा परिणाम शरीरावर होतो. भारतात चाळीशीनंतर हृदयविकार होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात हृदयविकाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या हृदयाला जपावे, असा सल्ला शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
छातीत दुखणे, पाठीत दुखणे, घाम येणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत. अशी वेळच येऊ नये, यासाठी तारुण्यातच आपल्या सवयी सांभाळायला हव्या. चाळीशी गाठलेल्या प्रत्येकाने ई.सी.जी., इको किंवा टीएमटीची चाचणी करणे आवश्यक आहे.
यात पॉझिटिव्ह आढळल्यास अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, पेसमेकर अशा पद्धतीने उपचार करता येतात. तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करणाऱ्यांमधील ७० टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकाराने होतो. हृदयरोगापासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे व्यसन, धूम्रपान, स्थुलता टाळली पाहिजे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, शरिरातील चरबीचे प्रमाण, मधुमेह आदी बाबींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, पोषक जीवनशैली असेल तर औषधे घ्यावी लागणार नाहीत.
रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण योग्य राखण्यासाठी काही प्रमाणात स्निग्ध पदार्थ आणि भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. मांसाहार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तूप, बेकरी पदार्थ शक्यतो टाळावे, असा सल्लाही डॉ. जगताप यांनी दिला.
दुधी भोपळ्याचा रस घ्यावा
बदलती जीवनशैली व तणावाचे वातावरण यामुळे आज तरुणांमध्येही हृदयविकार दिसून येत आहे. ज्यांना हृदयविकार नाही, अशांनी अधून-मधून एक कप दुधी भोपळ्याचा रस घ्यावा. तर, हृदयरोग झालेल्यांनी दररोज एक कप रस घ्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांतील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनाने शेकडो हृदयग्रस्तांना लाभ झाला आहे.
डॉ. अ. के. डोरले (अध्यक्ष-हृदय मित्र मंडळ, नागपूर)