वीज ग्राहकांच्या बिलांमध्ये अतिरिक्त वीज आकार आणि अतिरिक्त इंधन अधिभाराच्या नावाखाली करण्यात आलेल्या सुमारे ३० ते ४० टक्के दरवाढीच्या  विरोधात १८ ऑक्टोबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलांमध्ये सर्वसामान्य ग्राहकांसाठी २५ टक्के तर शेतकऱ्यांसाठी दुप्पट दरवाढ करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यात ही देयके नागरिकांना प्राप्त झाली आहेत. या दरवाढीच्या विरोधात लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोकांच्या या असंतोषाला वाट मोकळी करून देणे आणि सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी अमरावती वीज दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलांची होळी केली जाणार आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ इंडस्ट्रिज असोसिएशन, विदर्भचे अध्यक्ष किरण पातूरकर यांनी दिली.
वीज बिलात सरासरी ३० ते ४० टक्क्यांची दरवाढ झाली आहे, ती अन्यायकारक आहे. औद्योगिक वीज ग्राहकांच्या बिलामध्ये प्रति युनिट १.१२ रुपये ते १.७५ रुपये अशी सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ करण्यात आली आहे. कृषी पंपांचे वीज बिल देखील दुप्पट झाले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना देखील या दरवाढीची झळ पोहोचली आहे. यामुळे उद्योग, यंत्रमाग, शेती आणि राज्यातील सर्वच उत्पादक क्षेत्रावर आणि पर्यायाने राज्याच्या विकासावर घातक परिणाम होणार आहेत. ही दरवाढ कमी झाली की काय, येत्या दोन ते तीन महिन्यात महावितरण कंपनीच्या बहुवार्षिक व्यावसायिक योजनेत यापेक्षाही जास्त दरवाढ होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र हे वीजेच्या बाबतीत सर्वाधिक महागडे राज्य बनले असतानाही महावितरण कंपनी तोटय़ातच आहे. गेल्या दशकभरात सातत्याने दरवाढ करण्यात आली. एकाच वर्षांत चार वेळा दरवाढ होण्याचेही प्रकार घडले. हजारो कोटी रुपये जनतेच्या खिशातून काढून घेण्यात आले, तरीही महावितरण कंपनी तोटय़ात आहे, हे अनाकलनीय आहे. शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात औद्योगिक ग्राहकांचे वीज दर प्रति युनिट २ ते ३ रुपयांनी अधिक आहे, त्याचा औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रावर परिणाम होत आहे. राज्यातील उद्योग विजेच्या वाढीव दरामुळे आधीच अडचणीत होत. आता अनेक उद्योग या दरवाढीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आले आहेत. राज्यात औद्योगिक गुंतवणूक कमी झाली आहे. अनेक उद्योजक बाहेरच्या राज्यांमध्ये निघून गेले, तर त्याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील या बिकट स्थितीमुळे बेरोजगारी वाढणार आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अमरावतीत १८ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता टाऊन हॉलमध्ये ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला  लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर दुपारी वीज बिलांची होळी केली जाणार आहे, अशी माहिती किरण पातूरकर यांनी दिली.