राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे सच्चे शिक्षणप्रेमी असल्याने कोल्हापुरात आयआयएम, आयआयटी, ट्रीपल टी यांसारखी उच्च शिक्षण संस्था स्थापन करावी, यानिमित्ताने त्यांचे पुरोगामी शैक्षणिक धोरण पुढे राहण्याबरोबर जिवंत स्मारक आकारास येईल, अशा आशयाची मागणी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या शाहूप्रेमींच्या बैठकीत करण्यात आली.
येथील शाहू मिलमध्ये राजर्षी शाहूमहाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शाहू मिलची पाहणी करून स्मारकाच्या संकल्पनेविषयी भाष्य केले होते. स्मारक कशा स्वरूपात असावे, यासंदर्भात जाणकारांची मते शासन ऐकून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या पाश्र्वभूमीवर शाहूमहाराजांचे स्मारक कसे असावे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी केशवराव भोसले नाटय़गृहातील पेंढारकर दालनामध्ये शाहूप्रेमी, कार्यकर्ते, नागरिक, अभ्यासक यांची बैठक झाली. त्यामध्ये कोल्हापुरात शाहूमहाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक परंपरा अधिक गतिमान व व्यापक स्वरूपात सुरू राहावी, यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील कार्य भक्कम केले जावे, असा सूर व्यक्त करण्यात आला.
शाहू मिलमध्ये शासनाच्या वतीने स्मारकाची संकल्पना आकारास येईल. शाहूमहाराजांच्या कार्याची दखल घेणाऱ्या काही गोष्टी अगोदरच कोल्हापूरमध्ये सुरू झालेल्या आहेत. शाहूमहाराजांचा पूर्णाकृती पुतळा तसेच शाहू मिलसमोर अर्धपुतळाही उभारण्यात आला आहे. अशा गोष्टींवर भर देण्याऐवजी शाहूमहाराजांनी शिक्षणविषयी जे पुरोगामी धोरण स्वीकारले त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याचे गरजेचे आहे. उच्च शिक्षणामुळे सामान्य, गरीब व दलित विद्यार्थी प्रगती करू शकणार आहे, हे महाराजांनी जाणून त्यादृष्टीने प्रयत्नही केले होते. याचे अवलोकन करता कोल्हापुरात आयआयएम, आयआयटी, ट्रीपल टी सारख्या प्रगत ज्ञानाचे शिक्षण देणारी संस्था आकाराला आली पाहिजे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातगांधी घराण्याच्या सहकार्यामुळे दोन आयआयटी संस्था सुरू होत असतील तर तेच धोरण महाराष्ट्रात राबवून कोल्हापुरात अशी संस्था सुरू व्हावी, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आला.
या चर्चेत महापौर जयश्री सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योजक अजय आजरी, चित्रपट निर्माते अनंत माने, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक, छावा संघटनेचे राजू सावंत, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शाहू अभ्यासक प्रा.माने, अशोक भंडारे, माजी महापौर राजू शिंगाडे, बाबा महाडिक, बाबा इंदुलकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, डॉ. संदीप पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव राणे, अॅड.माने, अॅड.संपतराव पवार, अनिल कदम, सुभाष देसाई आदींचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2013 रोजी प्रकाशित
उच्च शिक्षण संस्थांच्या स्थापनेतूनच छत्रपती शाहूमहाराजांचे खरे स्मारक
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे सच्चे शिक्षणप्रेमी असल्याने कोल्हापुरात आयआयएम, आयआयटी, ट्रीपल टी यांसारखी उच्च शिक्षण संस्था स्थापन करावी, यानिमित्ताने त्यांचे पुरोगामी शैक्षणिक धोरण पुढे राहण्याबरोबर जिवंत स्मारक आकारास येईल, अशा आशयाची मागणी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या शाहूप्रेमींच्या बैठकीत करण्यात आली.
First published on: 04-01-2013 at 09:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Higher education institution is true monument of shahu maharaj