आगामी लोकसभा निवडणुकीत जालना किंवा औरंगाबाद यापैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या दोन महत्त्वाच्या बैठका लवकरच मराठवाडय़ात होत आहेत. एक बैठक ७ सप्टेंबरला औरंगाबाद येथे होणार आहे. राष्ट्रवादीची वरिष्ठ नेतेमंडळी तसेच औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक असेल. वास्तविक आघाडीमध्ये जी जागा आपल्याकडे नाही, त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक पूर्वतयारीची बैठक घेणे राष्ट्रवादीकडून अपेक्षित धरले जात नाही. आतापर्यंतचे जागावाटप पाहता वर उल्लेख झालेल्या पाचपैकी परभणी व हिंगोली हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले आहेत. त्यामुळे पूर्वतयारीची बैठक परभणीसारख्या ठिकाणी झाली असती. परंतु जागावाटपाच्या अदलाबदलीत जालना किंवा औरंगाबादवर लक्ष ठेवूनच ७ सप्टेंबरची बैठक राष्ट्रवादीने औरंगाबादला घेण्याचे निश्चित केल्याचे मानले जाते.
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर व त्याआधी सलग पाच वेळा जालना मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. भाजपचा उमेदवार येथे विजयी झाला. सन १९९१पासून झालेल्या ६ निवडणुकांपैकी १९९८चा अपवाद वगळता पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार औरंगाबाद मतदारसंघातून निवडून आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होणारे मतदारसंघ म्हणून जालना व औरंगाबादची प्रतिमा मागील ५ निवडणुकांपासून निर्माण झाली आहे. त्यामुळेच यापैकी एक मतदारसंघ काँग्रेसकडून सोडवून घ्यावा, अशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची धारणा आहे. राष्ट्रवादीच्या जालना जिल्हा शाखेने यापूर्वीच जालना मतदारसंघ आपल्या पक्षासाठी सोडवून घ्यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अजून तरी पक्षपातळीवर अधिकृतरीत्या काही निर्णय जाहीर झाला नसला, तरी हिंगोलीची राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला देऊन त्याऐवजी जालना किंवा औरंगाबादची जागा काँग्रेसकडून सोडवून घेतली जाण्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांत आहे.
सन १९९१पासून सहा निवडणुकांत हिंगोलीत चार वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. सध्या मराठवाडय़ात राष्ट्रवादीचा एकच लोकसभा सदस्य असून ही संख्या वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या पाश्र्वभूमीवरील दुसरी बैठक राष्ट्रवादीतर्फे उस्मानाबादला घेतली जाणार आहे. बीड व उस्मानाबाद मतदारसंघांच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक असेल. मागील निवडणुकीत बीडमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला, तर उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीने जिंकली.
मराठवाडय़ात सध्या शिवसेनेचे औरंगाबाद, हिंगोली व परभणी असे लोकसभेचे ३ खासदार आहेत. भाजपचे बीड व जालना, काँग्रेस लातूर व नांदेड, तर उस्मानाबादची एकमेव जागा राष्ट्रवादीकडे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli go to congress
First published on: 23-08-2013 at 01:56 IST