शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायात वाढ झाली असून, गेल्या आठ दिवसांपासून मारहाणीचे सत्र सुरू आहे. काल रात्री सुभेदार वस्ती भागात एका तरुणावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुभेदारवस्ती येथील वसीम इस्माईल कुरेशी (वय २५) या तरुणास गुंडांनी बेदम मारहाण केली. त्यात या तरुणाचे डोके फुटले. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कुरेशी याच्या फ़िर्यादीवरुन पोलिसांनी सोन्या बेग, टिप्या बेग, अंकुश बेग, गुड्डू यादव, नईम शेख, शायना निसार शेख व अन्य दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हल्लेखोर कुप्रसिद्ध चन्या बेग टोळीचे आहेत. या टोळीने गेल्या ८ दिवसांत ३ ठिकाणी  प्राणघातक हल्ले केले. काही मारहाणीत फिर्यादी दाखल नाहीत तर काहीत मात्र पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.