राज्यातील एखाद्या मंत्र्याने नागरिकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी व्यासपीठावरून केलेली गर्जना संबंधित योजनेचा कसा बोजवारा वाजवू शकतो याचे उत्तम उदाहरण सध्या पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळत असून ३० खाटांऐवजी १०० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचे आश्वासन पनवेलकरांच्या आरोग्याच्या मुळावर उठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलसाठी ३० खाटांचे रुग्णालय मिळणार हे स्पष्ट झाले होते. त्यास प्रशासकीय मान्यता मिळून या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शेट्टी यांनी ३० खाटांच्या रुग्णालयाऐवजी १०० खाटांचे रुग्णालय येथे बांधू अशी घोषणा केली. पनवेलकरांनीही त्यास टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिल. तेव्हापासून ३० खाटांऐवजी १०० खाटांच्या रुग्णालयाच्या फाईलचा सुरू झालेला प्रवास अजूनही सुरूच आहे. निधीचा तुटवडा, बांधकामाचा आराखडा आणि आरोग्य विभागाची मंजुरी अशा प्रक्रियेत या रुग्णालयाचे काम रडतखडत सुरू आहे.
पनवेल ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सोमवारी तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रत्यक्षात रुग्णालयाच्या वास्तूमधून वैद्यकीय उपचार सुरू व्हायला पनवेलकरांना अजून एका वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राजकीय उदासीनता, प्रशासकीय दिरंगाई यांचे उत्तम उदाहरण म्हणून या रुग्णालयाच्या बांधकामाकडे पाहाता येईल. पनवेल शहर आणि तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर खासगी दवाखाने, प्रयोगशाळा, चिकित्सा केंद्र सुरू होत आहेत. पनवेल हे वैद्यकीय क्षेत्रासाठी उत्पन्नाचे नवीन केंद्र म्हणून समोर येत आहे. सरकारी रुग्णालय नसल्याने शहरांमध्ये वैद्यकीय व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाल्याने नवीन रुग्णालयाच्या इमारतीची गरज भासू लागली. पनवेल शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी यासाठी दहा वर्षांपूर्वी सरकारदरबारी पाठपुरावा केला. सरकारदरबारी पनवेलकरांची व्यथा मान्य झाल्यानंतर ३० खाटांचे रुग्णालय पनवेलमध्ये उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली.
रुग्णालयाची पायाभरणी झाली आणि कामाला सुरुवात झाली. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी पनवेलच्या सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत ३० ऐवजी १०० खाटांचे रुग्णालय उभारून देऊ असा शब्द पनवेलकरांना दिला. सद्यस्थितीत पनवेल नगरपालिकेच्या शेजारी या रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. तळमजल्याच्या बांधकामाला प्लॅस्टर चढविले जात आहे. अजून त्यावरचे दोन मजले चढायचे आहेत. तसेच शवागाराच्या कामाला सहा महिन्यापेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. ३० खाटांचे रुग्णालय १०० खाटांच्या करायच्या फंद्यात तांत्रिक प्रक्रिया उरकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने मूळ रुग्णालयाच्या उभारणीसही विलंब होऊ लागला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि विवेक पाटील या दोघांनीही आम्ही या रु ग्णालयासाठी प्रयत्न केल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. परंतु हे रुग्णालय होण्यासाठी सर्वानी एकजुटीने प्रयत्न करणे पनवेलकरांच्या हिताचे ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
आरोग्यमंत्र्यांची गर्जना पनवेलकरांच्या मुळावर
राज्यातील एखाद्या मंत्र्याने नागरिकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी व्यासपीठावरून केलेली गर्जना संबंधित योजनेचा कसा बोजवारा वाजवू शकतो याचे उत्तम उदाहरण सध्या पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळत असून
First published on: 19-02-2014 at 08:16 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hospital work get delayed