‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि आता पुन्हा एकदा ‘क्रिश ३’ म्हणजे पहिल्या चित्रपटापासून ते तिसऱ्या चित्रपटापर्यंत झालेला क्रिशचा प्रवास दिग्दर्शक म्हणून राकेश रोशन यांनी यशस्वीपणे एकाच धाग्यात गुंफला आहे. पण, तिसऱ्या सिक्वलमध्ये क्रिशच्या करामती आणि नविन खलनायकाबरोबरची लढाई अनुभवण्याआधी क्रिशची आत्तापर्यंतची दास्तान सांगणे गरजेचे होते. ही कथा सांगण्यासाठी राकेश रोशन यांनी थेट अमिताभ बच्चन यांना साकडे घातले. अमिताभनीही या प्रस्तावाला होकार दिला असल्याने आता क्रिश ३ मध्ये नव्या खलनायकाची ओळख आणि क्रिश त्याच्यापर्यंत कसा पोहोचला याची कथा चित्रपटात अमिताभ यांच्या जादुई आवाजात ऐकायला मिळणार आहे.
‘क्रिश’ चित्रपटात अभिनेता नसीरूद्दिन शहा यांनी खलनायक साकारला होता. आता तिसऱ्या सिक्वलमध्ये विवेक ओबेरायने खलनायकोची भूमिका केली आहे. विवेक बऱ्याच काळानंतर मोठय़ा भूमिकेत दिसणार असल्याने त्याची भूमिका पडद्यावर चांगली वठावी यासाठी भरपूर मेहनत घेतली गेली आहे. त्याचाच भाग म्हणून खुद्द अमिताभ बच्चन या चित्रपटात खलनायकाची ओळख करून देणार आहेत. याआधीही अमिताभ यांच्या आवाजाने चित्रपट आणि मालिकांमधून किमया केली आहे. आमिरच्या ‘लगान’ या चित्रपटात अमिताभ यांच्या आवाजाचा फार चांगला वापर करून घेण्यात आला होता. त्यांच्या या आवाजाच्या जादूनेच ‘कौन बनेगा करोडपती’ सारखा रिअ‍ॅलिटी शो छोटय़ा पडद्यावर गेले सहा वर्ष नंबर एकचे स्थान पटाकावून आहे. त्यामुळे सुपरहिरो क्रिशची कथा सांगण्यासाठी त्यांच्याच आवाजाचा उपयोग केला तर नक्कीच चित्रपटासाठी ते किमया करून जाईल, अशा विश्वासाने राकेश रोशन यांनी अमिताभ यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला होता. अमिताभनीही त्याला होकार दिला असल्याने ‘क्रिश ३’ मध्ये आता सुपरहिरो क्रिश म्हणजेच ह्रतिक रोशन, विवेक ओबेरॉय, प्रियांका चोप्रा, कंगना राणावत यांच्याबरोबरच बिग बीचेही अस्तित्व जाणवणार आहे.