आगामी लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर, बदलत्या राजकीय समीकरणांचा अभ्यास करता यावा, राजकीय पक्षाची भूमिका काय, उमेदवार आणि मतदार समोरासमोर यावेत, एकंदरीत घडामोंडीचे विश्लेषण व्हावे, या उद्देशाने येथील हं. प्रा. ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने राजकीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वृत्तपत्र विद्या विभागात १० ते १५ मार्च या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व प्रमुख राजकीय पक्ष, आघाडय़ांचे उमेदवार, प्रवक्ते या व्यासपीठावरुन आपली भूमिका मांडणार आहेत.
राजकीय जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन १० मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांच्यासह भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रानंतर भटेवरा यांचे बीजभाषण होईल. त्यानंतर राजकीय मंडळी आपली भूमिका स्पष्ट करतील. यानंतर विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराचा तास होईल. ११ मार्च रोजी तिसऱ्या आघाडीचे नेते उपस्थित राहतील. त्यात माकपचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार तानाजी जायभावे, दिंडोरीतील उमेदवार हेमंत वाघेरे, माकपचे शहर सचिव श्रीधर देशपांडे आपली भूमिका मांडतील. १२ मार्च रोजी आम आदमीचे नाशिक मतदारसंघातील उमेदवार विजय पांढरे, प्रवक्ते प्रभाकर वायचळे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
१३ तारखेला मनसे आणि १४ मार्च रोजी संयुक्त पुरोगामी आघाडीच्यावतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, दिंडोरीतील उमेदवार डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचा समारोप १५ मार्च रोजी होणार असून यावेळी विविध उमेदवारांनी मांडलेल्या भूमिकांचे विश्लेषण भटेवरा करणार आहेत. दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी या स्वरुपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याने अभ्यासकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, निशिगंधा मोगल व विभागप्रमुख डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले आहे.