माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याच्या आरोपावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात पती, दीर, सासूसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीस अटक केली आहे.
वैशाली विजय थोरात (वय २६, रा. सालोना प्रोजेक्ट, संतोष मंगल कार्यालयाच्या समोर, थेरगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वैशालीचे वडील रामराव सखाराम वडकुटे (वय ५७, रा. कल्याणनगर, परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पती विजय संभाजी थोरात, दीर प्रमोद थोरात, सासरे संभाजी थोरात, देविदास साळुंखे, भाग्यश्री थोरात व सासू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली व विजय यांचा विवाह २००७ मध्ये झाला होता. लग्नानंतर माहेरून पैसे आणावेत म्हणून तिचा सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. त्याच बरोबर वडकुटे यांनी मुंबई येथील सदनिका वैशाली व तिच्या पतीच्या नावावर केल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास याच वादातून वैशालीस घरातील पंख्यास गळफास देऊन जीवे ठार मारल्याची तक्रार वडकुटे यांनी दिली आहे. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पी. डी. पाटील हे अधिक तपास करत आहेत.