मनाच्या शांतीसाठी शोध घेण्याची गरज नाही. तर, मन शांत करणे शिकावे लागते. मनाच्या अस्वास्थ्यास माणूस स्वतच कारणीभूत आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुंबई केंद्राचे समुपदेशक प्रा. ई. व्ही. गिरीश यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत प्रा. गिरीश यांनी ‘मनशांतीचे शास्त्र’ या विषयावर १२ वे पुष्प गुंफले. यावेळी गिरीश यांनी आपण अशांत व्हायचे की नाही याचा निर्णय दुसरा कोणी का घेतो असा प्रश्न उपस्थित केला. माझे मन माझ्या ताब्यात आहे. नाराज व्हायचे की नाही ते मी स्वत: ठरविणार. परंतु असे ठरवूनही मनुष्य आपला स्वभाव विसरत नाही. त्यामुळे त्याच्या दु:खाचे कारण तो स्वत ठरतो.  मनाविरूध्द घडणाऱ्या घटना तसेच राग, द्वेष, मत्सर यामुळे मन अशांत होते हा गैरसमज आहे. आलेली परिस्थिती आपण कशा पध्दतीने हाताळतो यावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात. अशांत मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा हे एकमेव शास्त्र आहे. त्याचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. लहान बाळ सुरूवातीला अडखळत चालते, त्यानंतर व्यवस्थित आणि नंतर धावू लागते. त्याप्रमाणे मनालादेखील शिकवण्याची गरज असते. मनाच्या आदेशाप्रमाणे आपले हात, पाय तसेच इतर अवयव कार्य करतात. मनाला उजाळा देण्याचा प्रयत्न करा. त्याशिवाय ते शांत कसे होणार असा प्रश्न त्यांनी केला.
अंधकाराला आपले अस्तित्व असते. तर ते दूर करण्यासाठी प्रकाशाचा उजाळा करावा लागतो. मनाच्या शांतीची कमी म्हणजे राग होय. शांती मिळवण्यासाठी प्रथम त्याच्या उगमस्त्रोताशी संपर्क साधावा लागतो असे सांगत त्यांनी शांतीचे शास्त्र विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
किमान मनाला ताब्यात ठेवण्याचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी वासंती दीदी, हेमलता पाटील, नंदलाल चांदवडकर, सुरेश कुलकर्णी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human responsible for his own mental disturbance
First published on: 14-05-2014 at 08:37 IST