पत्नीबरोबर होत असलेल्या सततच्या भांडणांमुळे तिला जिवंत जाळून ठार करण्याचा कट रचणाऱ्या पतीला विष्णुनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. दरम्यान पतीच्या हल्ल्यात पत्नी ९५ टक्के भाजली असून तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला आरोपी दीपक पांडे (२४) आपली पत्नी उडिया आणि मुलासह डोंबिवली येथील उमेशगनरमध्ये राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. क्षुल्लक कारणांवरून दीपक पत्नी उडियाला शिवीगाळ आणि मारहाण करीत असे. अलीकडेच झालेल्या भांडणामुळे दीपकच्या मनात उडियाविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. हाच राग मनात ठेवून दीपकने तिची हत्या करण्याचा निर्णय केला. दीपकने घरातील स्टोव्हभोवती पत्नीच्या नकळत रॉकेल पसरून ठेवले आणि तिला चहा करण्यास सांगितले. उडिया चहा करण्यासाठी स्टोव्हजवळ गेली असता आगपेटीची काडी पेटवताच आगीचा भडका उडाला. त्यात ती ९५ टक्के भाजली आहे. तिला तात्काळ ठाण्याच्या नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नायब तहसीलदारांनी या जळीत महिलेचा जबाब घेतला. हा अहवाल विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांना मिळताच बुधवारी रात्रीच दीपकला अटक करण्यात आली. साहाय्यक निरीक्षक घाडगे तपास करीत आहेत. दीपक डोंबिवलीतील शिधावाटप दुकानात नोकरीला आहे.