काही विद्यार्थिनी एकमेकांना माती मळून देत होते, तर काही नवनवीन कल्पना सुचवित होते. कोणी नको असलेली माती बाजूला करण्यात मग्न, तर कोणी तयार होणाऱ्या मूर्तीला सुबक आकार देण्यात गर्क..
हे चित्र होते नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालय आणि चांडक कन्या विद्यालय, हिवरे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेतील. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, त्यांना पर्यावरणाची निगा राखण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य प्र. ला. ठोके, सचिन जाधव यांसह अनेक जण या वेळी उपस्थित होते. कलाशिक्षक राहुल मुळे यांनी प्रास्ताविकात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्यांचे पाण्यात विघटन होत नाही हे शास्त्र मांडले. अशा मूर्तीची विटंबना तर होतेच शिवाय जलस्रोताचेही नुकसान होते, पर्यावरणाची हानी होते, मूर्तीवरील ऑइलयुक्त रंगामुळे जलचरांना हानी पोहोचते. आपल्या शास्त्रात शेतातील काळी माती भिजवून त्यात शेण मिसळून तयार केलेल्या मूर्तीचे पूजन करावे असे म्हटले आहे. रंगकामासाठी गेरू किंवा नैसर्गिक रंग वापरण्याची सूचनाही त्यांनी केली.
प्राचार्य ठोके यांनी पर्यावरणाचे रक्षण करा, जबाबदारीने वागा आणि मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पूजनाचा संदेश आपले नातेवाईक, मित्रमंडळींपर्यंत पोहोचवून पर्यावरण रक्षण स्व निर्मिती व नवनिर्मितीचा आनंद घ्या असे सांगितले. प्रा. सचिन जाधव, कलाशिक्षक राहुल मुळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: चार दिवस आधीच शाडूची माती भिजत घालून मळून ठेवली होती. माती कोरण्यासाठी बांबूचे वेगवेगळे कोन तयार करण्यात आले होते. मातीच्या गोळ्यास आकार देताना मूर्तीचा पाट तयार करण्यात आला. त्यानंतर बांबूच्या कोरण्याच्या साहाय्याने गोळ्यातील नको असलेली माती कोरून त्यास सूबक आकार देण्यात आला. त्यातून साकारत गेली गणेशाची विविध रूपे. चांडक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वाती टोकेकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रुंगटा विद्यालयातील
 कार्यशाळेस प्रतिसाद
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरुण पैठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जु. स. रुंगटा विद्यालयात शाडू माती कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध मूर्तिकार तुषार कटय़ारे यांच्या हस्ते झाले. मंचावर पैठणकर, शालेय समिती अध्यक्ष जयंत मोंढे, दिलीप वाणी, पुष्पावती रुंगटा विद्यालयाच्या पर्यवेक्षिका स्वाती गलांडे आदी उपस्थित होते. शाडू माती कार्यशाळा हा पर्यावरणपूरक उपक्रम सहा वर्षांपासून संस्थेकडून राबविला जात असून यंदाचे हे सातवे वर्ष आहे. प्रास्ताविक कलाशिक्षक स्वप्निल कटय़ारे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नीलिमा दुसाने यांनी करून दिला. सूत्रसंचालन संगीता मालपाठक यांनी केले. आभार अशोक इंकाळ यांनी मानले.