सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा आपला राष्ट्रीय अधिकार आहे. हे थांबले पाहिजे, असे अनेकांना वाटते. परंतु हे वाटणे कृतीत आणणे क्वचितच कुणाला जमते. मात्र कांजुरमार्ग येते राहणाऱ्या एका संगणक अभियंत्याने ही करामत केली आहे. चार माहिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांची चक्क धुलाई करण्याचे उघडपणे आवाहन करणारा फलक घेऊन उभा राहणारा कृष्णा चव्हाण हा युवक सध्या मुंबईकरांमध्ये विशेषत: रेल्वे प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. एका खासगी कंपनीत संगणक अभियंता असलेला कृष्णा चव्हाण हा ३२ वर्षीय तरुण गेल्या चार महिन्यांपासून आपले स्टेशन, परिसर थुंकीमुक्त करण्यासाठी जनजागृतीची अभिनव मोहिम राबवत आहे. ‘आपले स्टेशन, आपला भारत देश थुंकीमुक्त करण्याचा एकच मार्ग-पब्लिक धुलाई, थुंकणाऱ्यांना पकडा, मारा, फटके द्या,तरच हा देश स्वच्छ सुंदर होईल’ असे आवाहन करण्याची मोहीम त्याने हाती घेतली असून त्यास चांगला प्रतिसादही मिळत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट आणि दादर स्थानकांवर कृष्णा हे जनजागृतीचे काम करतो.
सुरवातीस लोकांना हा ‘आप’चा उद्योग वाटला. परंतु शांतपणे आपल्या खटाटोपामागची भूमिका विषद करणाऱ्या कृष्णाकडे लोक हळूहळू आकृष्ट होऊ लागले. आता दररोज अनेक प्रवाशी त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या आंदोलनास शुभेच्छा देतात. तर काही कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नसून तुम्ही थुंकणाऱ्यांच्या हातात फुले देऊन त्यांना समजवा, असा सल्ला देतात. काही माहिलांनी आम्ही तयार आहोत, पब्लिक धुलाई केव्हा करायची अशी विचारणा केली. कुणाच्या काय तर कुणाच्या काय सूचना. मात्र आपण केवळ सामाजिक बांधीलकी म्हणून हे आंदोलन छेडले असून थुंकीमुक्तीचा आपला निर्धार पक्का असल्याचे कृष्णा सांगतो.
मुंबई महापालिका शहर स्वच्छता अभियानावर वर्षांला ३०६ कोटी रुपये खर्च करते. मात्र मूठभर लोकांच्या कुठेही थुंकण्याच्या विकृतीमुळे स्थानक, कार्यालये, रेल्वेंचे विद्रुपीकरण होत आहे. रेल्वे अधिनियमाच्या कलम ८४६ नुसार फलाटावर थुंकणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड होतो. मात्र सीएसटी ते कसारा दरम्यान महिनाभरात केवळ २५० ते ३०० लोकांवरच कारवाई होते. त्यातही थुंकणाऱ्यांना केवळ २०० रु. दंड केला जातो. त्यामुळेच थुंकणाऱ्यांचे फावते असे चव्हाण याचे मत आहे. याबाबत रेल्वे, पोलीस, न्यायालय, महापालिका आणि शासन दरबारी तीन वर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून काही झाले नाही. त्यामुळे आता ‘जनक्षोभा’शिवाय पर्याय नसल्याचे तो सांगतो. पुढच्या टप्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची पब्लिक धुलाई करण्यात येणार असून त्यासाठी आपल्यावर कारवाई झाली तरी पर्वा नाही असेही त्यांने सांगितले.