दि इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ आर्किटेक्ट संस्थेच्या नाशिक सेंटरच्या अध्यक्षपदी नुकतीच निलेश चव्हाण व उपाध्यक्षपदी प्रदिप काळे यांची निवड झाली. सदस्यपदी एकमेव महिला उमेदवार अमृता पवार यांची सर्वाधिक मताधिक्क्याने निवड झाली. सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्ष कार्यरत राहील. दि इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ आर्किटेक्ट संस्था प्रामुख्याने समाजास वास्तुकला शिक्षणासाठी उद्युक्त करणे, वास्तुविशारद व्यवसायाची पातळी परस्पर सहकार्यातून उंचावणे, व्यवसायानुषंगाने हितसंबंधाची जपणूक करणे या तीन उद्दीष्टाने प्रेरित होऊ काम करते. प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या व शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेच्या नाशिक सेंटरची २०१२-१४ या काळासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात निलेश चव्हाण यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. उपाध्यक्षपदाची धूरा प्रदीप काळे, खजिनदारपदी अमोल सावरकर, सहसचिव म्हणून रसिक बोथरा व समीर कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य म्हणून अमृता पवार, दिपक देवरे, दिप भागवत, चिन्मय धामणे, निलेश वाघ, ॠषीकेश पवार, संदीप येवला यांची निवड करण्यात आली. याच बरोबर विषय समित्यांची निवडही करण्यात आली. त्यात जनसंपर्क समितीत पंकज पुंड तर युवा वास्तुविशारद समितीचे निखील पाळेकर निवड करण्यात आली. संस्थेच्या आगामी नियोजनाबाबत लवकरच बैठक  होणार आहे. त्यात नगररचना विभागाबाबत सूचना, सुधारणा, बांधकाम परवानगीची प्रक्रियेचे संगणकीकरण करून सूसुत्रता आणून कामांचे नियोजन करणे, महापालिकेस विविध तांत्रिक विषयांबाबत सल्ला देणे, आगामी शहर विकास आराखडय़ासंदर्भात महापालिकेस सूचना करणे, तांत्रिक सल्ला उपलब्ध करून देणे, आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत सूचना करणे व संस्थेच्या माध्यमातून नियोजनात हातभार लावणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.