इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटसाठी नागपुरात मिहानमध्ये जागा आणि त्यासाठी तात्पुरत्या कॅम्पसची सोयही झाल्याने येत्या शैक्षणिक वर्षांत आयआयएम सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी येथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची (एमएचआरडी) चमू नागपुरात केव्हाही दाखल होऊ शकते.
अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) घोषणा जुलैमध्ये केली होती. त्यानुसार बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब येथे आयआयएम स्थापन करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात नागपूरची निवड आयआयएमसाठी करण्यात आली. त्यासाठी मिहानमधील २९३ एकर जागा मुख्यमंत्र्यांनी गेल्याचवर्षी त्वरित देऊ केली. आयआयएम लवकरात लवकर नागपुरात सुरू व्हावे म्हणून तात्पुरत्या कॅम्पससाठी विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीएनआयटी) ६ हजार ११६ चौरस मीटर जागा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्हीएनआयटी परिसराचे दर महिन्याला ६ लाख रुपये भाडे प्रस्तावित असून संबंधित जागेचा अहवाल विभागीय सहसंचालकांनी शासनास सादर केला आहे.
केंद्रीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे म्हणाले, व्हीएनआयटी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत येत असल्याने आयआयएमचा तात्पुरता कॅम्पस त्याठिकाणी सुरू करण्याकरता प्रभावी वापर करता येईल. येथील जागेचा प्रश्न सुटल्यानंतर शासनाकडून केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल. केंद्रातील एमएचआरडीची चमू कॅम्पसची पाहणी केल्यानंतर आगामी शैक्षणिक वर्ष २०१५-१६पासून आयआयएमसाठी प्रवेश होणे सुरू होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये एमएचआरडीची चमू नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iim will begin in the next academic year
First published on: 06-01-2015 at 07:31 IST