मुंबई आयआयटीच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी या विभागातील प्राध्यापकांनी लिहिलेल्या संशोधन प्रबंधाला अमेरिकी जैव रसायनशास्त्र आणि आण्विक जैवशास्त्र सोसायटीच्या ‘जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्री’ने ‘पेपर ऑफ द वीक’ म्हणून गौरविले आहे. नियतकालिकाच्या संपादकांनी प्राध्यापकांनी लिहिलेला हा प्रबंध वर्षभरातील दुसऱ्या क्रमांकावरील प्रबंध असल्याचे नोंदविले आहे.
आयआयाटीचे प्राध्यापक समीर माजी, प्रा. अशुतोष कुमार आणि प्रा. रणजित पदीनहातेरी यांनी ‘इल्युसिडेटींग द रोल ऑफ डिसल्फाइड बाँड ऑन अ‍ॅम्लॉइड फॉरर्मेशन अँड फिब्रीर रिव्हर्सिबिलिटी ऑफ सोमॅटोस्टेन-१४; रिलेव्हन्स टू इट्स स्टोअरेज अँड सेक्रेशन’ या मथळय़ाखाली हा प्रबंध लिहिला होता. या प्रबंधाची निवड करणाऱ्या संपादकीय मंडळाने हा प्रबंध वर्षांतील सवरेत्कृष्ट प्रबंधांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सवरेत्कृष्ट प्रबंध असल्याची नोंद केली आहे. हा प्रबंध जुलै महिन्याच्या आवृत्तीमध्ये प्रसिद्ध होणार आहे. या नियतकालिकासाठी आलेल्या ६,६०० प्रबंधांपैकी ५० ते १०० प्रबंध निवडण्यात आले आहेत.
आयआयटीच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या या प्रबंधामध्ये प्रथिन हार्मोन्सच्या रचनेतील बदलांबद्दल लिहिण्यात आले आहे. हा प्रबंध लिहिणाऱ्या प्राध्यापकांनी छोटय़ा प्रथिनांच्या हार्मोन्सच्या रचनेचा अभ्यास केल्याचे प्राध्यापक माजी यांनी स्पष्ट केले.
माणसाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सच्या रचनेत कसे बदल होत जातात याचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. या अभ्यासामुळे भविष्यात मानवी शरीरातील अनेक गुढ गोष्टींची उकल होण्याची शक्यताही प्राध्यापकांनी वर्तविली आहे.