मुंबई-नाशिक महामार्गावरील उंबरखांड येथे ग्लोबल प्रॉपर्टी या कंपनीच्या गोदाम बांधकामासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असून त्या ठिकाणी खडक फोडण्यासाठी स्फोटकांचा बेकायदेशीपणे वापर करणाऱ्यास शहापूर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून चार लाख रुपयांचा स्फोटकांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी कंपनीच्या पाचही मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, घटनास्थळावरून मुंबईला पाणी पुरवठा करणारी भातसा, तानसा व वैतरणा ही तीन मोठी धरणे सुमारे १५ ते २० कि.मी अंतरावर असून बेकायदेशीपणे स्फोटकांचा वापर होत असल्याने धरणांच्या सुरक्षितेता प्रश्न ऐरणीवर आला          आहे.
ग्लोबल प्रॉपर्टी या कंपनीच्या गोदाम बांधकामासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असून त्या ठिकाणी खडक फोडण्यासाठी स्फोटकांचा बेकायदेशीरपणे वापर सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या पथकाने सोमवारी त्या ठिकाणी छापा टाकून ८० डिटोनेटर, २० जिलेटीनच्या कांडय़ा, २० किलो अमोनियम नायट्रेट, दोन कॉम्प्रेसर, दोन जॅकहॅमर, वायरचे तुकडे व स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारी बॅटरी, असा चार लाख रुपयांचा स्फोटकांचा साठा जप्त केला     आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबई येथील दामू नामदेव खिलारी याला अटक केली असून कंपनीचे मालक घाटकोपर येथे राहणारे अब्दुला हनिफ मलीक व वल्लीवुल्ला हनिफ मलीक, ठाणे येथील अकबर ऐनउल्ला खान, मुंब्रा येथील इलियास नुरहसन खान आणि तुर्भे येथील विष्णू शिंदे या पाचही जणांचा शोध पोलीस घेत आहेत.