शहरातील हॉटेल्स, मॉल्स, मंगल कार्यालये अशी धनाडय़ांची पक्की अतिक्रमणे वाचविण्यासाठी महापालिका छोटे विक्रेते, टपरीधारकांची अतिक्रमणे हटवून गोरगरिबांची उपासमार करीत असल्याचा आरोप करत ही मोहीम त्वरित थांबविण्याची मागणी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक संघटनेने केली आहे. याच मुद्यावरून नाशिकरोड येथील टपरीधारकांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालयवर मंगळवारी मोर्चा काढून मोहीम थांबविण्याची मागणी केली. तसेच दोन दिवस बंदही पुकारण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाने फेरीवाला धोरणाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या छोटय़ा विक्रेत्यांना त्यात सामावून घेतले जाणार आहे. असे असताना महापालिका अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून उपरोक्त धोरणाच्या मूळ उद्देशाला छेद देत असल्याचे हॉकर्स व टपरीधारक संघटनेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. मुंबई नाक्यापासून सुरू झालेली ही मोहीम पुढे पंचवटी, दिंडोरी रोड आदी भागात राबविली गेली. पुढील काळात कॉलेजरोड, द्वारका व नाशिकरोडमधील सुभाष रोडवरील अतिक्रमणे हटविण्याचे सुतोवाच महापौर अॅड. यतिन वाघ यांनी केले होते. या मोहिमेंतर्गत छोटय़ा-मोठय़ा टपऱ्यांसह बँका व अन्य व्यावसायिकांची पक्क्या स्वरुपाची अतिक्रमणे हटविली गेली आहेत. असे असूनही हॉकर्स व टपरीधारक संघटनेने त्यावर आक्षेप नोंदविला आहे. छोटय़ा विक्रेत्यांवर कारवाई करून महापालिका हजारो पक्क्या अतिक्रमणांना अभय देते. बांधकाम व्यावसायिकांनी वाहन तळाची जागा विकून कोटय़वधी रुपये कमावले. अनेक बडय़ा मंडळीच्या अतिक्रमणांची यादी संघटनेने यापूर्वी महापालिकेला दिली होती. परंतु, त्यांच्यावर कारवाई न करता पुन्हा छोटय़ा विक्रेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी सांगितले. रस्त्यांवरील फेरीवाल्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही देशात सध्या अस्तित्वात असलेले व व्यवसाय करणाऱ्या सर्व हॉकर्स, टपरीधारकांना व्यवसाय करू द्यावा व कायद्याच्या अंमलबजावणीवेळी होणाऱ्या नोंदीत समाविष्ट करावे असे म्हटले आहे. या विक्रेत्यांबाबतचा निर्णय शहर फेरीवाला समिती घेईल. या धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि सध्या राबविली जाणारी अतिक्रमण निमूलन त्वरित थांबविण्याची मागणी चव्हाण यांनी केली. अतिक्रमण निर्मूलन मोहीम थांबवावी या मागणीसाठी छोटे विक्रेते व टपरीधारकांनी मंगळवारी नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच मंगळवार व बुधवार असे सलग दोन दिवस बंदही पुकारला आहे. महापालिकेच्या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2014 रोजी प्रकाशित
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या विरोधात टपरीधारक रस्त्यावर
शहरातील हॉटेल्स, मॉल्स, मंगल कार्यालये अशी धनाडय़ांची पक्की अतिक्रमणे वाचविण्यासाठी महापालिका छोटे विक्रेते, टपरीधारकांची अतिक्रमणे हटवून गोरगरिबांची उपासमार करीत असल्याचा आरोप करत ही मोहीम त्वरित थांबविण्याची मागणी नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक संघटनेने केली आहे.
First published on: 05-02-2014 at 09:26 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illgal shops protest against encroachment action committee