जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात खुलेआम अवैध दारूविक्री होत असताना बघ्याची भूमिका घेण्यात धन्यता मानणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता काही गावांतील सरपंच-उपसरपंचांना मदतीसाठी लेखी साकडे घातले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नांदेड जिल्ह्य़ात अवैध दारूविक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. अनेक भागात विनापरवाना, खुलेआम दारूविक्री होत असून त्याचा महसुलावरही परिणाम होत आहे. जिल्ह्य़ातील पोलिसांनी गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी छापे घालून विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली; पण ज्यांच्यावर ही प्रमुख जबाबदारी आहे त्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी वर्षभरात कोणतीही दखलपात्र कारवाई केली नाही.
नांदेड जिल्ह्य़ात आंध्र, तसेच कर्नाटकातून दारू आणून विकली जाते. शिवाय काही ठिकाणी बनावट दारूही तयार होते. काही महिन्यांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी बनावट दारू तयार करण्याच्या एका कारखान्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दरवर्षी वरिष्ठ कार्यालयाकडून उद्दिष्ट ठरवून दिले जाते. यंदा उद्दिष्टाइतका महसूल मिळेल की नाही, या बाबत या विभागाचे अधिकारीच साशंक आहेत.
अवैध दारूविक्रीमुळे उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची जाणीव झाल्यानंतर आता अवैध दारूविक्रीविरूद्ध माहिती जमा करण्याचे काम या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.
त्याचाच भाग म्हणून जिल्ह्य़ातील काही गावातील सरपंच-उपसरपंचांना पत्र पाठवून अवैध देशी-विदेशी व हातभट्टी दारूविक्री होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.