औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर कॅम्प येथील मत्स्यबीज उत्पादन केंद्रात प्रजोत्पादनासाठी ठेवलेल्या विविध जातींचे सुमारे १० ते १२ क्विंटल मासे अवैधरीत्या विक्री केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे.
मत्स्यबीज केंद्रातील प्रजोत्पादनासाठी ठेवलेल्या कटला, रोहू, सायप्रनस, मिरगल अशा विविध जातींचे सुमारे १०-१२ क्विंटल मासे काही दिवसांपूर्वी जवळपास ३०० मासे व्यावसायिकांनी अवैध विक्री केल्याचा आरोप आहे. या अवैध विक्रीमध्ये संबंधितांचे संगनमत असल्याने या प्रकरणी अत्यंत गुप्तता पाळली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सिद्धेश्वर कॅम्प मत्स्यबीज उत्पादन केंद्र मराठवाडय़ात लौकिकप्राप्त असून काही वर्षांपूर्वी मत्स्यबीज उत्पादन व विक्रीत मराठवाडय़ात हे केंद्र पहिल्या क्रमांकावर होते. परंतु गलथान व्यवस्थापन, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष व मोठय़ा प्रमाणात मासे चोरीचे प्रकार वाढल्याने केंद्राची अवस्था बिकट झाली आहे. आता हे केंद्र बंद पडणार काय? याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातही कहर म्हणजे येथे मत्स्यबीज उत्पादनासाठी ठेवलेले पूर्ण मासेच अवैध विक्री करून मत्स्यबीज केंद्र बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडे या बाबत निवेदन दिले असल्याची माहिती शेख हबीब यांनी दिली.