राज्याचे गृह राज्यमंत्री कोण- आर. आर. पाटील, लोकसभेच्या सभापती कोण- मीरा बोरवणकर, एमएलए व एमएलसीत फरक- एमएलसी म्हणजे अपघातात किंवा जाणूनबुजून केलेला जखमी. ही उत्तरे आहेत नवागत पोलीस शिपायांची. राज्य पोलीस दलातील नवागत पोलीस शिपायांचा सध्या ‘शीट रिपोर्ट’ तयार केला जात असून याप्रसंगी सर्वसामान्य ज्ञान तपासताना आलेली ही उत्तरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य पोलीस दलात पोलीस महासंचालकांपासून उपनिरीक्षकाला दरवर्षी गोपनीय अहवाल लिहावा लागतो. त्या खालील कर्मचाऱ्यांचा शीट रिपोर्ट तयार केला जातो. सध्या राज्यात हे शीट रिपोर्ट वा रिमार्क लिहिण्याचे काम सुरू आहे. पोलीस दलात दाखल होऊन दहा वर्षांहून जास्त कालावधी झालेल्या शिपायांचा पोलीस उपायुक्त तर त्यापेक्षा कमी कालावधीची नोकरी झालेल्यांचा सहायक पोलीस आयुक्त अहवाल तयार करतात. पोलीस निरीक्षक अथवा संबंधित विभाग प्रमुख यावेळी हजर असतात. प्रत्येक शिपायास एका वहीत नोकरीत लागल्यापासून रोज केलेल्या कामाची नोंद करावी लगते. एक नोंदवही तो काम करतो त्या ठिकाणी असते. हा अहवाल तयार करण्यासाठी विशिष्ट दिवस ठरवून तशी सूचना तीन-चार दिवस आधीच दिली जाते. वरिष्ठ अधिकारी एकेकाला बोलावून त्याची वैयक्तिक आणि खात्यातील नोंद वही तपासतात. त्याची वर्षभरातील वागणूक, कामाची पद्धत, गणवेश, सर्वसामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) आदींची त्याची वैयक्तिक तसेच खात्यातील नोंद वहीत केली जाते. त्याला मिळालेले पुरस्कार आणि शिक्षा याचीही त्यात नोंद असते.
राज्यभरात सध्या ‘शीट रिपोर्ट’ तयार करण्याचे काम सुरू आहे. नवागत पोलीस शिपायांची सर्वसामान्य ज्ञान तपासणीप्रसंगी झालेली प्रश्नोत्तरे धक्कादायक असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
राज्याचे गृह राज्यमंत्री कोण- आर. आर. पाटील, लोकसभेच्या सभापती कोण- मीरा बोरवणकर, एमएलए व एमएलसीत फरक- एमएलसी म्हणजे अपघातात किंवा जाणूनबुजून केलेला जखमी, एमएलए व एमएलसी आमदार आहेत मात्र ते कुठल्या सदनात बसतात- माहिती नाही, ५०४, ५११ ही कलमे केव्हा लावतात, ३०४ व ३०५ कलमांमधील फरक कोणता, नासुप्रचे सभापती कोण- संजय दराडे, एएनओचे डीआयजी कोण- अनुपकुमार सिन्हा, नागपूर रेंजचे डीआयजी कोण, माहिती नाही, राज्यसभेचे सभापती कोण- माहिती नाही, नागपूरचे खासदार कोण- माहिती नाही, शिवाजीराव मोघे यांच्याकडे कुठले खाते आहे- माहिती नाही, नागपुरात कुठले मंत्री राहतात- माहिती नाही, आयआरएसचा फुल फॉर्म काय- माहिती नाही.
पदवीधर तसेच उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या शिपायांची आहेत. आर. आर. उपाख्य आबा पोलीस दलात लोकप्रिय असले तरी शिपायांचे हे (अ) ज्ञान पाहता त्यांच्या निरंतर प्रशिक्षणासाठी ते काय करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अपवाद वगळता बहुतांश नवागत शिपायांचे सर्वसामान्य ज्ञान, कायद्याचे आणि प्रत्यक्ष कामाचे ज्ञान परिपूर्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस दलात दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणात या सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिपाई सकाळी अथवा रात्री डय़ुटीवर गेल्यानंतर त्याला एकतर बंदोबस्त अथवा गस्त यात व्यस्त रहावे लागते. असे असले तरी सर्वसामान्य ज्ञान परिपूर्ण नसले तरी अद्ययावत ठेवणे ही सर्वस्वी त्याचीच गरज असते.
ठाण्यातील प्रत्येक शिपायाला स्टेशन डायरी लिहिणे तसेच इतर कामांची माहिती होण्यासाठी संबंधित ठाणेदार अथवा विभाग प्रमुखाने मन ओतून पुढाकार घ्यायला हवा. प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. वरिष्ठ अधिकारीही व्यस्त रहात असले तरी त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून पुढाकार घ्यायला हवा, असे मत काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
केवळ नवागत पोलीस शिपाईच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीचे सर्वसामान्य ज्ञान आणि तो ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाची सखोल माहिती त्या व्यक्तीला असणे आवश्यकच आहे, असे मत सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांनी व्यक्त केले.
अधिकाऱ्याने त्याच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजे, या मताशी त्यांनी सहमती व्यक्त केली. त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्य ज्ञान वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2013 रोजी प्रकाशित
‘शीट रिपोर्ट’मध्ये नवागत शिपायांचे (अ)ज्ञान उघडे
राज्याचे गृह राज्यमंत्री कोण- आर. आर. पाटील, लोकसभेच्या सभापती कोण- मीरा बोरवणकर, एमएलए व एमएलसीत फरक- एमएलसी म्हणजे अपघातात किंवा जाणूनबुजून केलेला जखमी. ही उत्तरे आहेत नवागत पोलीस शिपायांची.
First published on: 29-01-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illiterateness of new gurds disclosed in sheet report