सावकारी कायद्यात महाराष्ट्र सरकारने केलेल्या सुधारणांबद्दल प्रजासत्ताकदिनी (दि. २६, रविवारी) होणा-या ग्रामसभेत जनजागृती केली जाणार आहे, त्यासाठी या कायद्याची व त्यात केलेल्या बदलांचे ग्रामसभेत वाचन करून चर्चा घडवली जाणार आहे. ग्रामसभेत या कायद्याची माहिती देण्यासाठी सहकार खात्याने जिल्हय़ात १ हजार ३१६ क्षेत्रीय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. जिल्हय़ात एकूण ९९ परवानाधारक खासगी सावकार असून त्यांनी ६ हजार ८७ कर्जदारांना ११ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज सन २०१२-१३ या वर्षांत दिले आहे. खासगी सावकारांना तारणावर १२ टक्के व विनातारणावर १५ टक्के व्याज वर्षांला आकारण्यास परवानगी आहे. बेकायदा सावकारीबद्दल गेल्या वर्षभरात १४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची शहानिशा करण्यात आली. तीन ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र गैर काही आढळले नाही, असेही हौसारे यांनी सांगितले.
राज्यात शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्येच्या मागे सावकारांकडून होणारी पिळवणूक हेही एक कारण असल्याचे उघड झाले. त्याला पायबंद घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुंबई सावकारी अधिनियम १९४६च्या कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा १६ जानेवारी २०१४ पासून लागू केला. त्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती देण्यासाठी सहकार खात्याने एक पुस्तिकाही तयार केली आहे. या पुस्तिकेचे वाचन ग्रामसभेत केले जाणार आहे. उपस्थित ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन क्षेत्रीय अधिकारी करणार आहेत. क्षेत्रिय अधिकारी म्हणून सहकार खात्यातील कर्मचारी, गटसचिव, पतसंस्थांतील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावकाराने स्थावर मालमत्तेचे बेकायदा हस्तांतरण केल्यास, ही मालमत्ता गहाण ठेवल्यास किंवा खरेदी केल्यास त्याविरुद्ध पूर्वी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची तरतूद होती. आता नवीन कायद्यात हे बेकायदा हस्तांतरण रद्द करून ते मूळ मालकाला परत करण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकाला दिले गेले आहेत, हा महत्त्वाचा बदल आहे. सावकारी परवाना मिळण्याची पद्धत, कर्जदाराचे अधिकार, व्याजदरावर बंधन, कर्जदाराचे संरक्षण असे इतरही काही बदल आहेत.
 बेकायदा सावकारीबद्दल हेल्पलाइन
सावकाराकडून होणारी पिळवणूक, फसवणूक, बेकायदा सावकारी याला आळा घालण्यासाठी सहकार खात्याने ०२२-४०२९३००० या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे. शेतक-यांनी शक्यतो बँका, सहकारी संस्था, पतसंस्था यांच्याकडूनच कर्ज घ्यावे, अपरिहार्य कारणाने सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आल्यास शेतक-यांनी काय काळजी घ्यायची याच्या सूचनाही सहकार खात्याने जारी केल्या आहेत.