जळगाव जिल्ह्यात भाजप, शिवसेनेचे वर्चस्व, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा

प्रदीर्घ काळापासून जळगाव शहरावर असलेले सुरेश जैन यांचे मोडीत निघालेले वर्चस्व..मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपचे एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी जंगजंग पछाडूनही त्यांनी मिळविलेला विजय..

प्रदीर्घ काळापासून जळगाव शहरावर असलेले सुरेश जैन यांचे मोडीत निघालेले वर्चस्व..मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपचे एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी जंगजंग पछाडूनही त्यांनी मिळविलेला विजय..घरकुल घोटाळा प्रकरणी तुरूंगात राहण्याची नामुष्की असतानाही तुरूंगातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अट्टाहास धरणारे सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे गुलाब देवकर या दोघांना पराभूत करून जनतेने दिलेले उत्तर..भाजप, शिवसेनेला जवळ करतानाच काँग्रेसला संपूर्णपणे उखडून टाकण्याची आणि राष्ट्रवादीला नाममात्र एक जागा देण्याची किमया..
जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक निकालाची ही काही वैशिष्टय़े. जिल्ह्यातील ११ मतदारसंघांमध्ये भाजपला सहा, शिवसेनेला तीन, राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे जागा मिळाल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत भाजप, शिवसेना प्रत्येकी दोन, राष्ट्रवादी पाच आणि इतर अपक्ष अशी स्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील सात विद्यमान आमदारांना घरी बसावे लागले आहे. भाजपने विजय मिळविलेल्या मतदारसंघांमध्ये सुरेश भोळे (जळगाव शहर), एकनाथ खडसे (मुक्ताईनगर), गिरीश महाजन (जामनेर), उन्मेष पाटील (चाळीसगाव), संजय सावकारे (भुसावळ), हरिभाऊ जावळे (रावेर) यांचा समावेश आहे.
शिवसेनेने वर्चस्व मिळविलेले उमेदवार व मतदारसंघ-गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चंद्रकांत सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा) तर, राष्ट्रवादीला एरंडोलमधून डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने एकमेव यश मिळाले. हा विजयही अगदीच निसटता आहे. अफाट लक्ष्मीदर्शनाच्या चर्चेने गाजलेल्या अमळनेर मतदारसंघात शिरीष चौधरी या अपक्ष उमेदवाराने सर्वच पक्षांना धूळ चारली.
प्रचारादरम्यान मतदारसंघांकडे दुर्लक्ष केल्याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांना बसला. राष्ट्रवादीने तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जमनेर, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा या मतदारसंघांकडे पाठच फिरवली. जिल्ह्यात इतरत्र राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील यांनी प्रचार सभा घेतल्या. परंतु त्यांचा फरसा परिणाम झाला नाही. याउलट भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचा धडाकाच उडवून देण्यात आला होता.
गंमत म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र विजयी उमेदवारांना मोदी लाटेचा फायदा होत असताना ज्या ठिकाणी मोदींची सभा झाली. त्या एरंडोलमध्ये भाजपचे उमेदवार मच्छिंद्र पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
भाजपकडून नितीन गडकरी, अमित शहा, स्मृती इराणी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, पंकजा पालवे-मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्या प्रचार सभा झाल्या. शिवसेनेकडून उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, रामदास कदम यांच्या सभा झाल्या.

जळगावमधील विजयी उमेदवार व मते
चंद्रकांत सोनवणे (चोपडा, शिवसेना)  ५४१७६
हरिभाऊ जावळे (रावेर, भाजप)    ५५९६२
संजय सावकारे (भुसावळ, भाजप)  ६४९४९
सुरेश भोळे (जळगाव शहर, भाजप) ६६६४५
गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण, शिवसेना) ८४०२०
शिरीष चौधरी (अमळनेर, अपक्ष)      ६८१४९
डॉ. सतीश पाटील (एरंडोल, राष्ट्रवादी) ६८१४९
उन्मेष पाटील (चाळीसगाव, भाजप)  ९४७५२
किशोर पाटील (पाचोरा, शिवसेना)  ८४५२०
गिरीश महाजन (जामनेर, भाजप)    १०११६५
एकनाथ खडसे (मुक्ताईनगर, भाजप) ८५६५७.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: In jalgaon suresh jain of shivsena and ncp gulabrao deokar both defeated

ताज्या बातम्या