अंधेरी पूर्वेचे शिधापत्रिका कार्यालय अंधेरी पश्चिमेला नव्या इमारतीत हलविण्यात आल्याने सध्या अंधेरी-जोगेश्वरीकरांना मोठय़ा गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
पश्चिमेला भवन्स महाविद्यालयाजवळ असलेले नवे कार्यालय तात्पुरते असले तरी ते पूर्वेकडे (के प्रभाग) राहणाऱ्या अंधेरी-जोगेश्वरीकरांच्या सोयीचे नाही. या कार्यालयाची जागाही अपुरी असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांसह कार्यालयात शिधापत्रिकेवरील नाव बदलणे, नाव कमी करणे, नाव वाढविणे आदी कामासाठी येणाऱ्या रहिवाशांना बसतो आहे.
अंधेरी-जोगेश्वरीकरांसाठीचे शिधापत्रिका कार्यालय गेली अनेक वर्षे अंधेरी पूर्वेला स्थानकाजवळील अलका इमारतीत होते. मात्र, ही इमारत मोडकळीला आल्याने पालिकेने हे कार्यालय येथून हलविण्याची सूचना शिधापत्रिका कार्यालयाला केली. या कार्यालयासाठी अंधेरीला पश्चिमेच्या बाजूकडील भवन्स महाविद्यालयाजवळ तात्पुरती जागा देण्यात आली आहे. मात्र, ही जागा फारच अपुरी आहे. मूळ कार्यालयात २८ कर्मचारी होते. पण, पूर्वेकडील कार्यालय अवघ्या दोन खोल्यांचे आहे. तेथे दाटीवाटीने केवळ १६-१७ कर्मचारीच बसू शकतात. कागदपत्रे, फायली ठेवण्यासाठीही कार्यालयात पुरेशी जागा नाही. त्यामुळे, कार्यालयाचा अर्धा कारभार सांताक्रुझ येथील कार्यालयात हलविण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी जेव्हा हे कार्यालय नव्या ठिकाणी हलविण्यात आले तेव्हा बराच गोंधळ उडाला. त्यावर आता येथील शिधापत्रिका अधिकाऱ्यांनी आपल्या परीने तोडगा काढला आहे. कार्यालयात कामासाठी येणाऱ्या सर्वच रहिवाशांचे काम करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे, सकाळी ९पर्यंत जे रहिवासी येतात केवळ त्यांनाच कूपन देऊन त्यांचे काम करून दिले जाते. उर्वरित रहिवाशांनी दुसऱ्या दिवशी यावे, असे सांगून त्यांची बोळवण केली जाते आहे, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशी संतोष बागवे यांनी व्यक्त केली.
अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयाची जागा गैरसोयीची आहे. त्यामुळे, नवे आणि कायमचे कार्यालय थाटायचे झाल्यास ते अंधेरी पूर्वेलाच स्थानकाजवळच कुठेतरी असावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीश पंडय़ा यांनी केली. या संबंधात येथील शिधापत्रिका अधिकारी श्रीयुत आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता नवे कार्यालय रहिवाशांसाठी गैरसोयीचे असल्याचे मान्य केले. ‘अंधेरी-जोगेश्वरीतील रहिवाशांसाठी अंधेरी पूर्वेलाच विजयनगर पुलाजवळ कायमचे कार्यालय असावे, असा प्रस्ताव आहे. या कार्यालयाच्या भाडय़ासंदर्भात बोलणी सुरू आहे. तसेच, दुरुस्ती, रंगरंगोटीचे कामही बाकी आहे. परंतु, दोनच महिन्यात आम्ही नव्या कार्यालयात कारभार हलवू,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.