साठवण बंधा-याने गावाची सोय झाली, मात्र एका महिलेचे कुटुंब त्यामुळे एखाद्या बेटावर गेल्यासारखे झाले असून, या बंधा-यातील पाण्याने या कुटुंबाचे दैनंदिन जीवनच कमालीचे कष्टप्रद झाले आहे. राष्ट्रपतींपासून तालुका स्तरापर्यंत सर्वाकडे वारंवार दाद मागूनही या कुटुंबाची परवड सुरूच आहे. त्यामुळेच आठ वर्षे संघर्ष करून हे कुटुंब आता हतबल झाले आहे.
कर्जत तालुक्यातील (जिल्हा नगर) आंबीजळगाव या गावातील विमल अनारसे यांचे कुटुंब या साठवण बंधा-यामुळे केवळ हे गावच नव्हेतर सर्वच बाबतीत तुटले आहे. शेतक-यांच्या मागणीनुसार सन २००५ या गावात साठवण बंधारा बांधण्यात आला. त्यासाठी ही जागाही उत्तम ठरली, मात्र त्यामुळेच या कुटुंबाची परवड झाली आहे. या बंधा-यात चांगल्यापैकी पाणी असते. बंधा-याच्या पलीकडे अनारसे कुटुंब राहते. येथे त्यांची थोडीफार शेतीही आहे. गावात हा साठवण बंधारा झाल्यामुळे या कुटुंबाचा रस्ताच बंद झाला असून त्यांची वस्ती चारही बाजूने पाण्याने वेढली आहे. विमल अनारसे याच कुटुंबातील कर्त्यां आहेत.
बंधारा झाल्यापासून या कुटुंबाला त्यातील पाण्यातूनच ये-जा करावी लागते. गावात येण्यासाठी त्यांना दुसरा रस्ताच नाही. बंधारा ओलांडण्यासाठी त्यांना बैलगाडीचा वापर करावा लागतो. बंधा-याला पाणी जास्त असले तर हे दळणवळणही पूर्ण बंद होते. या कृत्रिम बेटामुळे कुटुंबाची परवड सुरू असून, अनारसे यांच्या मुलींचे शिक्षणदेखील त्यामुळे थांबल्यात जमा आहे. पर्यायी रस्त्याअभावी पावसाळय़ाच्या काळात त्यांच्या मुलींची शाळेत महिनो न् महिने गैरहजेरी लागते.  
शेतात पिकलेला मालही त्यांना बाजारात आणता येत नाही. सध्या त्यांच्या शेतात बाजरी खुडून ठेवण्यात आली आहे, मात्र ती येथून हलवताच येत नाही. मागे त्यांनी ऊस लावला होता, मात्र तो कारखान्यावर नेताच आला नाही. आता हे कुटुंब शेती पडीक ठेवण्याच्याच विचारात आहे, मात्र त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी तर होणार आहेच, शिवाय दैनंदिन जीवनही ठप्प झाले आहे. बंधारा ओलांडताना एकदा पाण्यातच बैलगाडी कलंडली, त्यामुळे त्यांचा मुलगा पडला, त्याला या पाण्यातच सर्पदंशही झाला. या साठवण बंधा-याच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या या स्थितीची एकाही सरकारी यंत्रणेने दखल घेतली नाही, हे विशेष! थेट राष्ट्रपतींपर्यंत कैफियत मांडूनही अडचण कायम असल्याने हतबल झालेल्या या कुटुंबाचे जीवनच बिकट झाले आहे.