ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेने ‘ग्रंथयान’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून वाचकांच्या घरापर्यंत ग्रंथालय पोहोचविण्याचा प्रयत्न केला असून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. १ जुलैपासून केवळ पंधरा दिवसांमध्ये या उपक्रमात ७०हून अधिक वाचकांनी नोंदणी केली असून वाचकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तर ग्रंथालयाचे तीन हजारांहून अधिक वाचक या सेवेचा लाभ घेऊ लागले आहेत. वाचनाची इच्छा असणाऱ्या प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशातून सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील तीन विभागांत दिवसाला दोन तास हे ग्रंथयान आपली सेवा पोहोचवीत आहे, अशी माहिती ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
वाचकांच्या दारी ग्रंथालयाचे वाहन जाऊन तेथे पुस्तकांची देवाण-घेवाण करण्याची संकल्पना परदेशामध्ये आणि महाराष्ट्रात काही खासगी ग्रंथालय राबवीत होते. अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्याचा संकल्प २०१० साली भरविण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मराठी ग्रंथसंग्रहालयाने केला होता. या उपक्रमासाठीच्या निधीची उपलब्धता करून २६ जून रोजी औपचारिक उद्घाटनाने या उपक्रमाची सुरुवात झाली. १ जुलैपासून हे ग्रंथालय पूर्णपणे कार्यान्वित झाले आणि ‘ग्रंथयान’ ठाण्यातील लांबच्या प्रत्येक भागामध्ये पोहोचू लागले. सुरुवातीपासूनच या ग्रंथयानाचे प्रत्येक ठिकाणी भरभरून स्वागत होत असून दिवसाला सरासरी ४ ते ५ नव्या वाचकांच्या नोंदणी या ग्रंथयानात होऊ लागल्या आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये ७०हून अधिक नव्या वाचकांनी ग्रंथयानात नोंदणी केली असून हजारांहून अधिक वाचकांनी या ग्रंथयानास भेट दिली आहे. पुढील पंधरा दिवसांचे वेळापत्रक संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले असून त्यापुढे शंभराहून अधिक वाचक असलेल्या भागामध्ये हे ग्रंथयान महिन्यातून चार वेळा भेट देणार असून तेथे अधिक वेळ थांबणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदस्य नोंदणी सुरु..
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे संस्थेच्या ग्रंथयानची सभासद नोंदणी सुरू आहे. २०० रुपयांची अनामत रक्कम आणि १०० रुपयांच्या मासिक शुल्कासह वाचकांना नोंदणी करता येणार आहे. एका वेळी एक पुस्तक या वर्गणीमध्ये वाचकांना मिळू शकणार आहे. ग्रंथयान परिसरामध्ये पोहोचल्यानंतर त्या भागातील वाचकांना फोनवरूनसुद्धा कल्पना दिली जाते. इंटरनेटच्या साहाय्याने हे ग्रंथयान वाचकांशी सोडलेले आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in readership of grnthayan
First published on: 16-07-2014 at 06:57 IST