लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी ड्राय डे जाहीर करण्यात आल्यामुळे निकालाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गुरुवारी तळीरामांनी सकाळपासूनच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बीअरला जास्त मागणी असून राज्य सरकारच्या कृपेने सुरू झालेल्या बीअर शॉपींना दोन दिवस चांगले दिवस येणार असल्याचा रांगरंग आहे. शुक्रवारचा ड्राय डे वगळता गुरुवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस दारू विक्री दुप्पट होणार असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.
मागील काही वर्षांत राज्याने दारूविक्रीत प्रचंड प्रगती केली असून उत्पादन शुल्क वर्षांला दहा हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करीत आहे. त्यात सणासुदीला या दारूचा खप नेहमीपेक्षा वाढत असून पाच वर्षांनी येणाऱ्या या निवडणूक सणाला हा खप दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. विजय किंवा पराजयाच्या जोशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दारूबंदी जाहीर केल्याने देशातील सर्व दारूची दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी लागणारा स्टॉक खरेदी करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून काही दारूच्या दुकानांसमोर दूध केंद्रावर रांगा लागाव्यात अशा रांगा लागल्याचे चित्र होते. ऐरोली सेक्टर पाच येथील एका दारूच्या दुकानात सकाळी नऊ वाजता गर्दी दिसून येत होती. व्हिस्कीपेक्षा बीअरला जास्त मागणी असल्याचे या दुकानातील कृष्णा या सेल्समनने सांगितले. संध्याकाळी उशिरा या दुकानांवर अक्षरश: झुंबड पडणार असून सेल्समन्सची संख्या वाढविण्यात आल्याचे त्याने स्पष्ट केले.
दारू पिणाऱ्यांचे रविवार, बुधवार, शुक्रवार तसेच सणासुदीच्या विक्रीपेक्षा कोणत्याही निवडणूक काळात दारूची दुप्पट विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. ही निवडणूक लक्षवेधी आणि तरुणाईची पहिलीच निवडणूक असल्याने तरुण तळीरामांची संख्या वाढली आहे. यात बीअर पिणारी तरुणाई जास्त आहे. निकाल एकत्रित बसून एन्जॉय करणाऱ्यांनी आज रात्री फार्म हाऊस गाठण्यास सुरुवात केली असून तेथे लागणारा स्टॉक गाडीत भरताना अनेक वाहने दारूच्या दुकानासमोर दिसून येत होती. दारूच्या दुकानासमोर आढळणारी गर्दी ही केवळ गुरुवारसाठी राहणार नाही असे नेरुळमधील एका दुकानदाराने सांगितले. निकाल लागल्यानंतर शनिवार, रविवारी ही विक्री आणखी वाढणार आहे. त्यामुळे दारू दुकानदारांचे येत्या तीन दिवसांत चांगभलं होणार असून एका दुकानदाराची विक्री दहा ते बारा लाख रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दारू पिऊन धांगडधिंगा घालणाऱ्या तळीरामांना मात्र पोलीस कोठडीची हवा खाऊ घालण्यास पोलीस तेवढचे तत्पर आहेत. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण याच काळात गुजरातमध्ये सर्वाधिक दारूविक्री होणार आहे, असे एका दुकानदाराने स्पष्ट केले.