गेल्या पंचेचाळीस वर्षांनंतर शहरात प्रथमच किमान तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्दी, पडशासह अन्य आजारही डोके वर काढू लागले आहे. त्याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा बसत आहे. त्यामुळे नागरिकांनी या बोचऱ्या थंडीपासून बचाव करावा, विशेषत: लहान मुलांची काळजी घ्यावी, असा सल्ला शहरातील डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नगपूरकरांना थंडीला तोंड द्यावे लागत आहे. थंडीचे दिवस आरोग्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जात असताना थंडीचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे दुष्परिणामच दिसू लागले आहेत. प्रत्येक जण या थंडीमुळे कुडकुडू लागला आहे. या थंडीमुळे सर्दी, पडशे यासोबतच थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, हुडहुडी भरणे, त्वचा कोरडी व लाल होणे आदी आजार दिसून येत आहे. या आजाराचे सर्वच वयोगटातील रुग्ण शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही मोठय़ा संख्येने दिसून येत आहे. विशेषत: लहान बालकांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. त्यांची त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे त्वचा लाल येणे, खाज येणे आदी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लहान मुलांचे सर्व शरीर गरम कपडय़ांनी झाकून ठेवावे. आंघोळ करताना शक्यतोवर थंडी लागणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच वृद्धांनी थंडीत बाहेर पडू नये, शक्यतोवर दुपारचे उन्हं घ्यावे, थंड भोजन घेऊ नये, थंड पाण्याचा वापर करू नये, हातात हातमोजे आणि पायात पायमोजे घालावे, असा सल्ला मेडिकलचे अधीक्षक डॉ. जे.बी. हेडाऊ यांनी दिला आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी दोन-दोन श्वेटर, कानटोपी व मफलरसारख्या ऊनी कपडय़ांचा नागपूरकर वापर करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: दुचाकी वाहनचालकांना मात्र ते आवश्यक झाले आहे. रात्रीच्या सुमारास जिकडे तिकडे शेकोटय़ा पेटलेल्या दिसून येत आहे. उनी कपडे विक्रीच्या दुकानावर प्रचंड गर्दी बघावयास मिळत आहे. विदर्भातील नागरिकांमध्ये ९ ते १० अंश सेल्सिअस किमान वातावरण सहन करण्याची क्षमता असते, असे म्हटले जाते. परंतु सध्या किमान वातावरण ५ अंशावर येऊन पोहोचल्याने त्याचा परिणाम मानवी व्यवहारावर दिसून येत आहे. जवळपास आणखी एक आठवडा असेच वातावरण राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशा वातावरणाचा परिणाम लहान मुले आणि वृद्धांवर अधिक होतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात उष्मांक वाढवणाऱ्या पदार्थाचा वापर करावयास हवा, असे मत नागपूर जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.एम. बोरकर यांनी व्यक्त केले आहे. हाडे गोठणारी थंडी असताना रात्रीच्या सुमारास शहरातील फुटपाथवर झोपलेले नागरिक दिसून येतात. अशा थंडीमुळेच त्यातील काहींचा मृत्यू होतो. परंतु त्याची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणूनच केली जाते. तेव्हा, अशा नागरिकांची जिवंतपणी दखल घेण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे यावे, असे बोलले जात आहे.
ही काळजी घ्यावी
ल्ल शून्य ते तीन वर्षे वयाच्या बालकास ऊनी कपडे घालावे. त्याच्या त्वचेला ओलावा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
ल्ल घरामध्ये थंड हवा येणार नाही, याची काळजी घ्यावी.
ल्ल बाळाला झोपवताना जमिनीवर झोपवू नये.
ल्ल थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर पाणी घालण्याऐवजी त्याला स्पंजने पुसून घ्यावे.
ल्ल अंग कोरडं झाल की त्यावर सर्दीच औषध लावावे.
ल्ल ताप असेल तर बाळ लघवीवाटे शरीरातील पाणी बाहेर टाकतात. ही लक्षणे दिसताच त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात न्यावे.
ल्ल वृद्धांनी संपूर्ण शरीर झाकले जाईल, अशा ऊनी कपडय़ांचा वापर करावा.
ल्ल शक्यतोवर थंड पाण्याचा वापर टाळावा. थंडीत बाहेर पडू नये.
ल्ल सर्वसामान्य नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वेटरसह कान झाकेल यासाठी कानटोपरे किंवा ऊनी मफलर वापरावे.