वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सर्वच परिसर सापडला असल्याने त्याचा दुष्परिणाम लहान मुलांवर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण गेल्या काही दिवसांत १० ते १२ टक्क्यांनी वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना या आजाराला सर्वाधिक सामोरे जावे लागणार असल्याचा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
लहान मुलांमध्ये अनुवंशिक आणि अ‍ॅलर्जिक अशा दोन प्रकारचा अस्थमा होतो. वाढत्या अस्थमाच्या प्रमाणाबाबत बोलताना ज्येष्ठ अस्थमातज्ज्ञ डॉ. रवी चरडे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, गेल्या काही दिवसांत वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे अस्थमाचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी हे प्रमाण वयोवृद्ध लोकांत जास्त दिसून येत होते. हेच प्रमाण आता लहान मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे. जगभरात याचे प्रमाण दहा लाखाच्या घरात असून नागपुरातही या रोगाचे प्रमाण वाढण्याची लक्षणे प्रखरतेने दिसू लागली आहेत. अस्थमा असलेल्या बाल रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे, वारंवार उद्भवणारी सर्दी, खोकल्यामुळे श्वसननलिका ही आकुंचित होते. त्यामुळे शरीरातील हवा बाहेर जात नाही. या हवेचा जीवाणूंशी संपर्क झाल्यास त्यास प्रतिकार करण्याची क्षमता नसल्याने हा आजार लहान मुलांमध्ये जास्त दिसू लागला आहे.
प्रदूषणानंतर घरांमध्ये वावरणाऱ्या कीटकांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले जात आहे. घरातील झुरळांमुळे  ३३ प्रकारचे जीवाणू, ६ प्रकारचे पॅरासायटिक कीडे तसेच ७ ह्य़ूमन व्हायरल आणि बॅक्टेरिया पॅथोजेन्सच्या प्रसाराचे काम होत असते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात असून अस्थमाचे प्रमाण वाढण्याचे हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. सतत खोकला येणे, श्वास बाहेर सोडण्यास त्रास होणे, छातीवर वजन पडल्यासारख वाटणे, ही सगळी अस्थमाची लक्षणे आहेत. पोटामध्ये इन्फेक्शन झाल्यानेदेखील दमा होण्याची शक्यता अधिक असते. भारतातील सहा मुलांमध्ये एका मुलाला दम्याचा त्रास जडतो. सीआरएफ या संस्थेने केलेल्या पाहणीत २००३ मध्ये २.५ टक्के, २००८ मध्ये केलेल्या पाहणीत ५.५ टक्के, तर २०१३ मध्ये १० टक्केच्या वर अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात आयएमए, नागपूर शाखेचे सचिव डॉ. कुश झुनझुनवाला म्हणाले, आयएमएतर्फे अस्थमाच्या बाबतीत जनजागृती केली जाते. नुकतेच एक वैद्यकीय तंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या सत्राला १७० डॉक्टर उपस्थित होते. यापुढे प्रत्येक शाळेत जाऊन तेथील मुलांमध्ये व शिक्षकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
जनजागृतीसाठी डॉक्टरांच्या चमू तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय वर्षभर व्याख्यान, चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. औषधोपचारामुळे अस्थमा रुग्णाला थोडे बरे वाटते. परंतु आजार मात्र दूर होत नाही. हा आजार होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ. झुनझुनवाला यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.