मानसिक आरोग्याबाबत असणारे अज्ञान आणि गैरसमज दूर करण्याच्या हेतूने डोंबिवलीतील सायकलपटू सचिन गावकर भारत परिक्रमा करणार आहे. मानसिक आरोग्याासाठी कार्यरत येथील ‘आयपीएच’ अर्थात ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ’ या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त त्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.

५ जानेवारी रोजी ठाण्यातून त्याच्या परिक्रमेस सुरुवात होईल. देशभरातील २५ राज्ये पालथी घालून, १४ हजार किलोमीटर अंतर कापून २२३ दिवसांनी १५ ऑगस्ट रोजी तो पुन्हा ठाण्यात परतणार आहे. परिक्रमेतील या अनुभवांचे एका माहितीपटाच्या आधारे सचिन संकलनही करणार आहे. आधी दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत, त्यानंतर कोलकत्ता, पूर्वाचल, मग काश्मीर, दिल्ली, पंजाब असा त्याचा प्रवास असेल.  
डोंबिवलीत राहणारा सचिन गावकर याने जे.जे.स्कूल ऑफ आर्ट संस्थेमधून शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने घोडबंदर येथील एका शाळेमध्ये कलाप्रशिक्षक म्हणून काम केले. या काळात ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर हा प्रवास अत्यंत खर्चीक ठरत असल्याने त्याने सायकलवरून हा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तेथूनच त्याला सायकलिंगची आवड निर्माण झाली. डोंबिवलीतील एका सायकलप्रेमी क्लबमध्येही तो जाऊ लागला. बदलापूरमधील सायकलप्रेमी हेमंत जाधव आणि पनवेलचे धनंजय मदन यांनी सचिनच्या  सायकलप्रेमास खतपाणी घातले. त्यातूनच त्याने गोवा-मुंबई अशी सायकलस्वारी केली. जून २०१२ मध्ये त्यांनी लडाखच्या मनाली ते खार्दुगला असा ५७० किमीचा प्रवास पूर्ण केला. हिमालय आणि ट्रेकिंग या दोन्ही गोष्टींबद्दलचे अज्ञान यामुळे त्याला या प्रवासापूर्वी कोणतीच भीती वाटली नाही. प्रवास खडतर होता. मात्र ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला.  त्याने आतापर्यंत तब्बल साडे आठ हजारांहून अधिक किमीचा सायकल प्रवास केला आहे.
ठाण्यातील इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ संस्थेशी गेल्या १४ वर्षांपासून सचिन गावकर संलग्न आहे. संस्थेच्या ‘आवाहन’ या दृक्श्राव्य विभागासाठी तो काम करतो. यंदा संस्था २५ र्वष पूर्ण करत असल्याने या निमित्ताने संस्थेसाठी वैयक्तिक पातळीवर काहीतरी करण्याचे आवाहन संस्थेचे डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले होते. गावकर याने त्याला प्रतिसाद देत भारत परिक्रमेची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर या परिक्रमेचे आयोजन करण्यात आले. सचिन गावकर कोणत्याही स्व-मदत गटाशिवाय एकटय़ाने हा प्रवास करणार आहेत. आयपीएच संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून हा प्रवास केला जाणार असून या प्रवासादरम्यान तो शाळा, महाविद्यालय आणि मानसिक आरोग्याशी संबधित संस्थांच्या भेटी घेऊन विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधणार आहे. तसेच ती माहिती चित्रित करून ठेवणार आहे.
दररोज आठ ते दहा तासांत सुमारे ८० किलोमीटर अंतर तो कापणार असून उर्वरित वेळेत लोकांशी संवाद साधणार आहे. तसेच जनजागृतीसाठी पत्रके वितरित करणार असल्याची माहिती सचिन गावकरने ‘ठाणे वृत्तान्त’शी बोलताना दिली. ठाणे वेध परिषदेत रविवारी डॉ. आनंद नाडकर्णी आणि समस्त ठाणेकरांनी सचिनच्या या सायकल प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India circuit for awareness about mental health
First published on: 16-12-2014 at 06:34 IST