देशातील सर्व संस्थाने विलीनीकरणाचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिले जात असले, तरी त्यामागे पंडित जवाहरलाल नेहरू ठामपणे उभे होते. कारण समग्र एकात्म भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करताना परराष्ट्रांमध्ये देश म्हणून आपण किती मजबूत आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न पंडित नेहरू यांनी नेहमीच केला, असे मत अॅड. राज कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे ‘पंडित नेहरू आजच्या संदर्भात’ कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. एकात्म भारताचा संदेश देशांतर्गत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा व त्याच वेळी परराष्ट्रातही तो व्यवस्थित जावा, याची काळजी नेहरू नेहमी घेत. भारताचे परराष्ट्र धोरण अधिक सजग व मजबूत असायला हवे, या साठी त्यांनी प्रयत्न तर केलेच. त्यांच्यानंतर हे क्षेत्र हाताळणारा तेवढा सक्षम नेताही झाला नाही, असे कुलकर्णी म्हणाले.
नेहरू पंतप्रधान, काँग्रेसचे नेते, संपादक, परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ म्हणून किती प्रगल्भ होते, याची सविस्तर माहिती कुलकर्णी यांनी व्याख्यानात दिली. विशेषत: हैदराबाद मुक्तिसंग्रामात नेहरूंनी घेतलेल्या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले, की काश्मीर व हैदराबाद यांच्या मुक्तीचा लढा एकाच वेळी लढायचा होता. एक जबाबदारी त्यांनी स्वत:वर घेतली आणि दुसरी जबाबदारी सरदारांवर दिली. याचा अर्थ हैदराबाद मुक्तीकडे त्यांचे लक्ष नव्हते, असा नाही. काश्मीरमधील फौजांना वेळ मिळाल्यानंतर त्या लगेच हैदराबाद मुक्तीसाठी पाठविण्यात आल्या. पाठवताना फौज पाठवली. पण, या कारवाईला नाव मात्र पोलीस अॅक्शन दिले. कारण हैदराबादचा मुक्तिलढा हा फौजेकडून हाताळण्याचा विषय नाही, तर ते बंड अंतर्गत आहे, हे सांगण्याचा हेतू होता. असे अनेक संदर्भ अॅड. कुलकर्णी यांनी उलगडून दाखविले.
इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसमधील बहुतांश नेत्यांची इंग्रजी भाषा अत्यंत डौलदार होती. सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांचे नेतृत्व या भाषेमुळेही बहरल्याचेही ते म्हणाले. प्रशासकीय निर्णय घेताना आणि वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपांतील तथ्यही त्यांनी उलगडून सांगितले. डॉ. दादा गोरे यांनी सूत्रसंचालन केले.