साधारणत: दोन वर्षांपूर्वी आकारास आलेल्या आणि स्वत:ची जागा नसल्याने भाडे तत्वावरील जागेतून कारभार हाकणाऱ्या इंदिरानगर पोलीस ठाण्यास लवकरच स्वत:ची इमारत लाभणार आहे. जाखडीनगर भागातील जागेवर या पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. आ. वसंत गिते यांनी त्याकरिता पाठपुरावा केला.
शहरातील लोकसंख्या आणि पोलीस ठाण्यांची संख्या यांच्यात बरीच तफावत असल्याचे लक्षात घेऊन मध्यंतरी अंबड पोलीस ठाण्यात समाविष्ट असलेला काही भाग विलग करून इंदिरानगर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बहुतांश परिसर निवासी वसाहतीचा आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर स्वत:ची जागा नसल्याने राजीवनगरमधील शुभम या इमारतीत भाडेतत्वावर जागा घेण्यात आली. या जागेतून या पोलीस ठाण्याचे कामकाज केले जाते. इमारतीतील ही जागा कमी पडत असल्याने दैनंदिन कामकाजातही अनेक अडचणींचा सामना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. शहराची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन आ. वसंत गिते यांनी नवीन पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. त्यात इंदिरानगर पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधण्याच्याही विषयाचा समावेश होता. नागपूरच्या अधिवेशनात याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. गृहराज्यमंत्र्यांनी या पोलीस ठाण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यासाठी इमारतीचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे पाठविला होता. त्याचा पाठपुरावा करून गृहमंत्र्यांकडून या कामास मंजूरी घेण्यात आली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या बांधकामाबाबत लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती. आ. गिते यांनी दिली. इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगरचा परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे. या भागात स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थानिकांची मागणी मान्य झाली असली तरी या पोलीस ठाण्यास स्वत:ची इमारत नव्हती. या निमित्ताने हा प्रश्नही मार्गी लागला आहे. जाखडी नगरमधील जागेत इंदिरानगर पोलीस ठाण्याची प्रस्तावित जागा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव चौधरी यांनी दिली.