बाराव्या वर्षी अंधत्व आल्यानंतर आई-वडिलांनी अनेक पुस्तके वाचून दाखवली. त्यात दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय महिलेने लिहिलेल्या पुस्तकाचाही समावेश होता. त्यातून काळेपण हा अंधार नाही तर उजेड आहे, ही गोष्ट ध्यानात आली. त्यानंतर अंधत्व कधीच प्रगतीच्या आड येऊ दिले नाही. मेंदूच्या दृष्टिकोनातून विचारांच्या साहाय्याने प्रतिमा तयार केल्या आणि त्यातूनच अंध व्यक्तींसाठी रचनात्मक कार्याचा ढाचा तयार झाला, असे प्रतिपादन केरळ येथे अंध व्यक्तींच्या उत्कर्षांसाठी ‘कंथारी’ या संस्थेद्वारे कार्यरत आंतरराष्ट्रीय कीर्तीची जर्मन समाजसेविका सेब्रिएल टेनबर्केन हिने येथील वेध व्यवसाय परिषदेत प्रकट मुलाखतीदरम्यान केले.
वयाच्या नवव्या वर्षी सेब्रिएलची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली आणि बाराव्या वर्षी तिला पूर्णत: अंधत्व आले. अंधत्व येत असताना शाळेतील मित्र-मैत्रिणींनी टाळण्यास सुरुवात केली, तेव्हाचे क्षण फारच वेदनादायक होते. पुढे अंध मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी चांगले सहकार्य केल्याने आत्मविश्वास निर्माण झाला, असेही तिने सांगितले.
साहसी स्वभावाच्या सेब्रिएलचा तिबेट हा आवडता देश. तिला तिबेटी भाषा शिकायची होती. मात्र तिबेटी भाषेत ब्रेल लिपी नसल्याचे तिच्या लक्षात आले. मग प्रयत्नपूर्वक तिने तिबेटी ब्रेल लिपी बनवली. शासनानेही तिला मान्यता दिली. त्यामुळे तेथील अंधांचे जीवन आमूलाग्र बदलले. कारण त्याआधी पूर्वजन्माचे पाप म्हणून अंध मुलांना तिबेटमध्ये वाळीत टाकले जात असे. तिबेटमधील नागरिकांचा अंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास तिचे हे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. याच देशात तिला तिचा जीवनसाथी पॉल भेटला. आई-वडिलानंतर माझ्या स्वप्नांवर विश्वास असणारा पॉल ही एकच व्यक्ती असल्याचे तिने सांगितले.
सध्या तिबेटमध्ये अंध मुलांच्या साथीने चाळीस एकरच्या जागेत पाच प्रकल्प कार्यान्वित असल्याचे तिने सांगितले. यात मसाज प्रशिक्षण तसेच ब्रेल पुस्तके बनवण्याचे केंद्र, पशुपालन केंद्र, चीज बनवण्याचे केंद्र, बेकरी यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असल्याचे तिने सांगितले.   
हिमालय सर्वप्रथम सर करणाऱ्या अंध व्यक्तीच्या साथीने शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर हिमालयात २३ हजार फूट उंचीवर केलेल्या प्रवासाचे सुरेख वर्णन सेब्रिएलने या वेळी केले. भारतामध्ये सेब्रिएल केरळ येथे उभारण्यात आलेल्या तिच्या ‘कंथारी’ संस्थेच्या माध्यमातून कार्य करीत आहे. तिने लिहिलेल्या तीन पुस्तके  तेरा भाषांमध्ये अनुवादित करण्यात आली आहेत.