महापालिकेत स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर पराभवास जबाबदार म्हणून महानगर अध्यक्ष सुरेश भोळे यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आल्याने पक्षांतर्गत असंतोष खदखदायला लागला असून हा वाद चव्हाटय़ावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भाजपने स्वबळावर सत्तेत येण्याचे ध्येय बाळगले होते. तथापि, पक्षाला बहुमत तर दूर पण फक्त १५ जागा मिळाल्याने पक्षाची सैरभैर अशी अवस्था झाली आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी हा पराभव गंभीरतेने घेतला असून गद्दारांना धडा शिकविला जाण्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी मागील वेळेपेक्षा चार जागा कमी मिळाल्या तरी तेथे वाद उद्भवला नाही.
भाजपला मात्र पाच जागा जास्त मिळूनही वादाला तोंड फुटले आहे. भाजप महानगर अध्यक्ष सुरेश भोळे यांनी पराभवाला जबाबदार म्हणून दिलेला राजीनामा जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांनी स्वीकारला. तर सहा पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.
 घरकुलसह इतर घोटाळ्यांविरुद्ध खडसे यांनीच आवाज उठविला व त्याची परिणती म्हणून सुरेश जैन दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. खडसे यांनीच निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राजीनामा दिलेले भोळे यांचे दुर्दैव असे की, ते कट्टर भाजपचे असले तरी त्यांचे मेहुणे राष्ट्रवादीत, मेहुण्यांचे मोठे भाऊ काँग्रेसमध्ये व त्यांचा भाचा सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहे. भोळे यांचा भाचा माजी महापौर विष्णू भंगाळे ज्या प्रभागातून निवडणूक लढले तेथे भाजप उमेदवारासाठी झालेल्या प्रचार सभेत खडसे यांनी काढलेल्या उद्गारांमुळे भोळे यांच्या भावना दुखावल्याचे बोलले जाते.
भोळे यांच्याप्रमाणेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी राजीनामा देणे आवश्यक होते असेही काहींचे म्हणणे आहे. श्रीकांत खटोड या वजनदार तसेच खडसे समर्थकाने रमेश जैन यांच्या विरोधातून अचानक माघार का घेतली, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या पराभवासाठी कोणी कोणाशी हातमिळवणी केली, या प्रश्नांची चर्चा सुरू आहे.