मराठी युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने मनसेच्या रोजगार स्वंय रोजगार विभागाच्या वतीने येथील ‘राजगड’ कार्यालयात रविवारपासून ‘महा रोजगार मेळावा’ अंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून सोमवारी एकूण ९७० जागांसाठी एक हजार ३५३ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मनसेचा रोजगार विभाग आणि मिनव्‍‌र्हा एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन रविवारी आ. वसंत गिते, अतुल चांडक, मनपा सभागृह नेते शशिकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पहिल्याच दिवशी सुमारे १५०० उमेदवारांसाठी १३ कंपन्यांमधील अधिकारी जवळपास ५०० नोकरीच्या संधी घेऊन उपस्थित होते. ३० जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात सुमारे ४० कंपन्यांच्या वतीने १५०० जागांवर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२७ व २८ जानेवारी हे दोन दिवस कार्यालयीन कामकाजासंबंधित तर उर्वरित दोन दिवस औद्योगिक विभागाशी संबंधित नोकऱ्यांसाठी मुलाखती होतील. सोमवारी एकूण ९७० जागांसाठी एक हजार ३५३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात ग्लोबल बीपीओ आणि वर्गो बीपीओ यांच्या सर्वाधिक प्रत्येकी ३५० जागांचा समावेश होता. या व्यतिरिक्त ब्ल्यू बर्ड, डब्ल्यूएनएस, पृथ्वी इन्र्फोमेशन सोल्यूशन्स, एस. बी. एन्टरप्राइझ, इन्डस इंड बँक, नाशिक सव्‍‌र्हिस डॉट कॉम, इल्यूमिनियस टेक्नॉलॉजी, एअरटेल टेलिकॉम, रिलायन्स लाइफ इन्शुरन्स, मेट लाइफ इन्शुरन्स, डिश टीव्ही या कंपन्यांच्या वतीनेही मुलाखती घेण्यात आल्या.