अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या वादाकडे सध्या डोळे बंद करून पाहणे योग्य असल्याचे मत ज्येष्ठ नाटय़व चित्रपट कलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
आसिम एन्टरटेंटमेंट निर्मित ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाच्या निमित्ताने डॉ. मोहन आगाशे नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणूका गेल्या काही दिवसापासून गाजत असल्या तरी त्याकडे सध्या तरी डोळे बंद करून पाहणे एवढीच भूमिका ठेवली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मोहन जोशी आणि विनय आपटे यांनी एकमेकावर आरोप करण्यापेक्षा गुण्यागोविंदाने राहून निवडणूक लढविणे योग्य आहे असा सल्ला डॉ. आगाशे यांनी दिला.
वाद कुठे होत नसतात. राजकारणात सुद्धा दोन राजकीय पक्ष आपसात भांडत असतात. एकमेकांवर टीका करीत असतात, त्यामुळे नाटय़ परिषदेमध्ये सध्या त्यापेक्षा वेगळे काही घडत नाही.  खरे तर हा परिषदेच्या दृष्टीने चुकीचा पायंडा आहे. दोघांनी परिषदेमध्ये राहून गुण्यागोविंदाने काम केले तरच नाटय़ परिषदेचे कल्याण होईल. स्वतच्या कल्याणासाठी आणि स्वार्थासाठी वादावादी आणि आरोप प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षांचा आहे तो पुरे आहे. खरे तर संमेलनाचा अध्यक्ष हा केवळ संमेलनापुरता तीन दिवसाचा असतो आणि ती तीनच दिवस राहावा, असेही आगाशे म्हणाले.
खलनायकाची भूमिका करणारे अनेक कलावंत आहेत. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करीत असतात. खलनायक आता नायक झाले आहेत. नवीन पिढीमध्ये नाटय़कलेची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने शब्दाची आणि भावनाची भाषा त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे. नाटय़ चित्रकला, शिल्पकलेसोबत नाटय़ कलेचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले गेले पाहिजे. दूरदर्शनवरील मालिकांमध्ये काम करणे कमी केले असल्याचे डॉ. आगाशे म्हणाले.