भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत तासभर अखिल भारतीय आकाशवाणी संगीत समारंभात सोलापूरचे युवा प्रतिभावंत कलावंत भीमण्णा जाधव व गोरखनाथ जाधव बंधू सुंद्रीवादन करणार आहेत. या सुंद्रीवादनाचे थेट प्रसारण सर्व आकाशवाणी केंद्रांद्वारे होणार आहे.
सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पं. चिदानंद जाधव यांचे चिरंजीव असलेल्या जाधव बंधुंपैकी भीमण्णा जाधव यांनी नुकत्याच झालेल्या फ्रान्स येथील आंतरराष्ट्रीय फिमू फेस्टिव्हलमध्ये भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून सहभागी होत सुंद्रीवादन केले होते. नवी दिल्लीच्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचेही ते प्रतिनिधी आहेत. तर, भीमण्णा व त्यांचे बंधू गोरखनाथ जाधव यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनासह तानसेन संगीत महोत्सव (ग्वाल्हेर),  दुर्लभ महोत्सव (भोपाल व जबलपूर), शिल्पग्राम महोत्सव (उदयपूर), सुवर्ण संगीत प्रतिभा महोत्सव (जयपूर), अल्लादिया खान संगीत महोत्सव (मुंबई) आदी विविध नामांकित संगीत महोत्सवांमध्ये हजेरी लावून सुंद्रीवादनाची कला देश-विदेशात पोहोचवली आहे. काशी विश्वनाथ उत्सव (वाराणसी), ख्वाजा गरीब नवाज उत्सव (अजमेर), उस्ताद बिस्मिल्लाखान उत्सव (दिल्ली) संगीत संशोधन अकादमी (कोलकोता) याठिकाणीही जाधव बंधूंनी सुंद्रीवादन करून या कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. याशिवाय त्यांना विविध शिष्यवृत्त्यांसह मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्या संगीतसेवेची दखल घेऊन अखिल भारतीय आकाशवाणी संगीताच्या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनी सुंद्रीवादन करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. या कार्यक्रमात त्यांना रामदास पळसुले हे तबल्यावर साथ करणार आहेत.