महागाई काबूत ठेवण्यासाठी उपाययोजना करा, रोजगारवाढीसाठी प्रयत्न करा, सर्वाना किमान १० हजार रुपये वेतन करावे अशा विविध मागण्यांसाठी कामगार-कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने बुधवारी शासकीय दूध डेअरी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी स्वत:ला अटक करवून घेत जेल भरो आंदोलन केले. आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
देशभरात या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह-जेलभरो आंदोलन करण्याचे घोषित केले होते. समान कामाला समान वेतन लागू करावे, बोनस व भविष्यनिर्वाह निधीवरील सर्व मर्यादा उठवावी, उपदानाची मर्यादा वाढवावी, संघटित व असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना लागू करावी अशा विविध १० मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे. अ‍ॅड. उद्धव भवलकर, के. एन. थिगळे, बुद्धिनाथ बऱ्हाळ, सुभाष लोमटे, रवींद्र पिंगळीकर यांच्यासह मोठय़ा संख्येत कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.