पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेतला. दरबारात एकूण ७२ तक्रारअर्ज दाखल झाले. मात्र, बंद खोलीत तक्रारींवर चर्चा करून निपटारा केल्याने दरबारास आलेल्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा संघटक जी. डी. मुळे यांनी पत्रकाद्वारे या प्रकाराचा निषेध केला.
पालकमंत्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र, मंत्र्यांना शिवसैनिक घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पाहून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या चेहऱ्यावर चिंता असल्याचे दिसत होते. दरबारात सहभाग नोंदविण्यासाठी मंडपात नागरिक प्रतीक्षा करीत होते. दुसरीकडे मंत्री गायकवाड, आमदार जयप्रकाश दांडेगावकर, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल, माजी आमदार गजानन घुगे आदी जिल्हाधिकारी कक्षात जि. प.च्या विविध मुद्दय़ांसह दलित वस्ती सुधार व मागासक्षेत्र विकास निधीच्या प्रश्नावर चर्चा करीत होते. मार्चपर्यंत जि. प.तील विकासकामांचा निधी खर्च करण्याची जबाबदारी पालकमंत्री व आमदारांनी घ्यावी, अशी सूचना घुगे यांनी मांडली. जि. प.मध्ये तुमची सत्ता आहे. या संस्थेला प्राप्त निधी खर्च करण्याचे तुमचे अधिकार तुम्ही वापरून नियमाच्या चौकटीत बसवून ते खर्च करा. काही अडचणी आल्या, तर आम्ही तुम्हाला मदत करू, असे आमदार दांडेगावकर या वेळी म्हणाले.जनता दरबारासाठी मोठे मंडप टाकले होते. पण तक्रारींवर मंडपात चर्चा न करता पालकमंत्र्यांनी बंद खोलीत चर्चा केली. यावर पालकमंत्र्यांचा हा जनता दरबार नव्हता, तर शासकीय दरबार होता, असा आरोप मुळे यांनी केला.