शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ हे महानाटय़ शनिवार, ५ जानेवारीपासून ते १० जानेवारीपर्यंत डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण शिवकाल या महानाटय़ातून सादर करण्यात येणार आहे. दररोज सुमारे सात ते आठ हजार नागरिक या महानाटय़ाचा लाभ घेणार आहेत. शनिवारी संध्याकाळी पावणेसात वाजता श्रीगणेश पूजन, तुळजाभवानी पूजा बांधून या महानाटय़ाला सुरुवात करण्यात येणार आहे. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित असतील. ‘लोकसत्ता’ या महानाटय़ाचे माध्यम प्रायोजक आहे. या महानाटय़ात २५० कलाकार, हत्ती, घोडे आहेत. या महानाटय़ाचा रंगमंच दीड फुटाने उंच वाढविण्यात आल्याने खुर्ची, बाकांवर बसणाऱ्यांना या वेळी रंगमंचाजवळ होणारे कार्यक्रम बसल्या जागी पाहता येतील. शिवाजी महाराजांचा जन्म, मोहिमा, लढाया, अफझलखान वध, आग्य्राहून सुटका असे अनेक प्रसंग या महानाटय़ात सादर करण्यात येणार आहेत. नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी हे आणखी एक वैशिष्टय़ आहे. सहा दिवसांत सुमारे साठ ते सत्तर हजार नागरिक या महानाटय़ाचा लाभ घेतील, अशी शक्यता संयोजकांनी व्यक्त केली आहे.
जिजाऊ, शिवाजी महाराज, औरंगजेब, अफझलखान, शायिस्तेखान, संभाजी महाराज, कवी भूषण असे अनेक कलाकार चालता बोलता शिवपट उलगडून दाखविणार आहेत. या सर्वावर शाहिराची अदाकीरी कळस चढविणार आहे. संपर्क- अमरेंद्र पटवर्धन ९८२१०६५६५१.