पानोली रस्त्यावर रविवारी दुपारी दुचाकीस चिरडून फरार झालेल्या भरत चेडे यास सोमवारी पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी पुणेवाडी शिवारात ताब्यात घेतले.
पानोली रस्त्यावरील चित्रा हॉटेलमध्ये मद्यपान करून पारनेरकडे भरधाव वेगाने जीप घेऊन येताना चेडे याने दुचाकीस चिरडले. या अपघातात संतोष ठकसेन शिंदे हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचे वडील ठकसेन दामू शिंदे यांचे नगरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. याच अपघातातील संतोष याची आई बदामबाई यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर जीप अडकल्याने भरत याने ती पुन्हा मागे घेतली त्यामुळेच शिंदे पिता-पुत्रांना प्राण गमवावे लागल्याचा शिंदे यांच्या नातलगांचा आरोप आहे. आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी नातलगांनी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले होते.
शिवरकर यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी अपघातातील जीप रविवारी रात्रीच कान्हूर पठार येथून ताब्यात घेतली होती. कान्हूर पठार येथे गाडी सोडून भरत तेथून फरार झाला होता. त्याच्याविषयी त्याचे नातलगही माहिती देत नसल्याने अखेर शिवरकर यांनी भरत याचे वडील तसेच मामाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर भरत याचा शोध लागला. दरम्यान, भरतच्या साथीदारांपैकी संपत यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिघांनीही मद्यपान केल्याचे कबूल केले. त्याच्या रक्ताची चाचणी घेण्यात आल्यानंतर त्यात अल्कोहोल आढळून आल्याचेही सांगण्यात आले.