एखाद्या घटनेचे वास्तव मांडताना हल्ले होतात म्हणून घाबरून न जाता पत्रकारांनी सदोदित व समाजाच्या वेदना समजून लिखाण करावे, तसेच लिखाण करताना कोणी दुखावला जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी. समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे सामथ्र्य पत्रकारांमध्ये आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बबन बांगडे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माहिती संचालक भी. म. कौशल, बंडू लडके, कल्पना पलिकुंडवार, रामकृष्ण नखाते, डॉ. षडाकांत कवठे, डॉ. उमाकांत धोटे, विनोदसिंह ठाकूर उपस्थित होते. यावेळी तरुण भारतचे साईनाथ सोनटक्के यांना शांताराम पोटदुखे शैक्षणिक विकास वार्ता पुरस्कार देऊन ढोबळे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार शिवराम कोसे यांना, लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांना, चंपतराव लडके स्मृती पुरस्कार बाळ निंबाळकर यांना, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार उषा बुक्कावार यांना, रामवती ठाकूर स्मृती पुरस्कार भीमा वानखेडे यांना, श्रीनिवास तिवारी स्मृती शोधवार्ता पुरस्कार रवी खाडे यांना, समता नालमवार स्मृती जिल्हा विकास वार्ता पुरस्कार यशवंत मुल्लेमवार यांना, तर चांगुणाताई मुनगंटीवार स्मृती पर्यावरण पुरस्कार सीमा मामीडवार यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ढोबळे म्हणाले, देशातील परंपरा व रुढींमध्ये झपाटय़ाने बदल होत असल्यामुळे वाचन संस्कृती जपण्यासाठी आजच्या पिढीला वृत्तपत्रांची आवश्यकता आहे. पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांना पुन्हा प्रेरित होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाला १ लाखाची देणगी ढोबळे यांनी यावेळी जाहीर केली.
इस्ट इंडिया कंपनीच्या काळात बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीयांच्या शोषणाविरुद्ध लिखाण करून वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. सद्यस्थितीत पत्रकारितेचे सिंहावलोकन करण्याची वेळ आली असून पत्रकारांनी सामाजिक, आर्थिक विषमतेविरुद्ध लिखाण करून ही विषमता दूर करावी, असे आवाहन माहिती संचालक कौशल यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. याप्रसंगी लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते दिवं. अ‍ॅड. केशवराव नालमवार ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुरलीमनोहर व्यास यांनी केले. संचालन मोरेश्वर राखुंडे यांनी, तर आभार डॉ. उमाकांत धोटे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, बाळासाहेब साळुंके, खत्री गुरुजी, रमेश मामीडवार, बाळ हुनगुंद, सत्यनारायण तिवारी, चंद्रगुप्त रायपुरे, नारायण महावादीवार, सुरज बोम्मावार, प्रा. शरद बेलोरकर, अंबिका प्रसाद दवे, व्ही. डी. मेश्राम, वामनराव झाडे, यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक, शहर व जिल्ह्य़ातील पत्रकार उपस्थित होते.